
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- केंद्रीय यंत्रणाचा वापर करताना आपले प्रवक्ते अमुक-तमुक नेत्यावर कारवाई होणार असे आधीच जाहीर करतात आणि दुसऱ्या दिवशी कारवाई होते. यामध्ये काही हॉटलाईन बसवली आहे का?, असा सवाल उपस्थित करतानाच विरोधी पक्षनेते न्यायालयात जाणार बोलत आहेत. याचा आनंद वाटला ‘एका तरी यंत्रणेवर त्यांचा विश्वास आहे’, असा खोचक टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लगावत विरोधकांवर निशाणा साधला.
काल (ता.14 मार्च) सभागृहात वळसे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. त्यामुळे वळसे पाटीलांनी जोरदार बॅटींग करत विरोधकांचे अक्षरशः वाभाडे काढले.
सरकारने गृहविभागासाठी घेतलेले चांगले निर्णय सांगतानाच भाजपने केंद्रीय यंत्रणांचा केलेला गैरवापर, अवैध फोन टॅपिंग, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर झालेली गैरकारवाई यासह फडणवीस यांनी जो पेनड्राईव्ह सभागृहात दाखल केला त्यावर भाष्य करत सत्य बाहेर काढण्याचे व सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश वळसे पाटीलांनी दिले आहे. वळसे पाटील म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी भाषण करत असताना १९९३, २००८ च्या बॉम्बस्फोटाचा विषय काढून त्यावर भाषण केले. विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे.
मी देखील गृहमंत्री म्हणून काम केले आहे, असे बोलताना देशात नियमाने काम करणारे असे महाराष्ट्राचे पोलिस दल आहे ही भावना मांडली असताना मात्र, दुसऱ्या बाजूला याच पोलिस दलावर विश्वास न ठेवता प्रत्येक प्रकरण सीबीआय किंवा अन्य यंत्रणेकडे द्या, असे विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे दुःखद असल्याचे वळसे पाटीलांनी म्हटले आहे. आपण मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंना ३३ हजार विहीरांचा जलयुक्त शिवार कामाचा एक पेन ड्राईव्ह दिला होता. दोन दिवसांपुर्वी आपण आणखी एक पेनड्राईव्ह दिला आणि आजही एक पेन ड्राईव्ह दिला.
म्हणजे आपण काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय? असा सवालही वळसे पाटीलांनी फडणवीसांना करताच सभागृहात एकच हशा पिकला. आपण जो पेनड्राईव्ह दिलेला आहे, त्याचा तपास राज्यशासन करणार आहे. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे, तो सरकारने स्वीकारला आहे. हे सांगतानाच या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय वळसे पाटीलांनी जाहीर करत त्या चौकशीतून वस्तूस्थिती समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.