
दैनिक चालु वार्ता
माकणी प्रतिनिधी
माकणी :- लोहारा तालुक्यातील माकणी येथे (दि.१४.४.२०२२): डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान असून सबंध विश्वभर ते ज्ञानाचे प्रतीक( Symbol of Knowledge ) म्हणूनच आेळखले जातात . जीवनभर अखंड ज्ञानसाधना करून संपादन केलेले ज्ञान त्यांनी आधुनिक भारताची जडणघडण करण्यासाठी उपयोगात आणले .त्यांनी संपादन” केलेले ज्ञान, त्यांनी केलेले समाजकार्य , त्यांनी केलेले धर्मांतर व आधुनिक राष्ट्र निर्मितीतील त्यांचा क्रियाशील सहभाग पाहिला म्हणजे ते महान राष्ट्रपुरुष असल्याचे प्रतीत होते , असे प्रतिपादन ॲड. राजेंद्र लातूरकर यांनी केले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील माकणी येथील भारत शिक्षण संस्थेच्या कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजिलेल्या ‘ सर्वव्यापी आंबेडकर ‘ या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एच.एन. रेडे हे उपस्थित होत. कार्यक्रमारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे अतिथींच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले . प्रमुख पाहुण्यांच्या यथोचित स्वागतानंतर प्रमुख व्याख्यानाला आरंभ झाला.आपल्या ओघवत्या व अभ्यासपूर्ण भाषणात पुढे बोलताना ॲड. राजेंद्र लातूरकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असंख्य विद्याशाखेतील अधिकारी पुरुष होते.विश्वविख्यात विद्यापीठात अखंड ज्ञानसाधना करून त्यांनी सुमारे बत्तीस उच्चतम पदव्या संपादन केल्या.
एवढेच नसून अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र,घटनाशास्त्र न्यायशास्त्र, राज्यशास्त्र ,इतिहास, समाजशास्त्र, वास्तुरचनाशास्त्र ,धर्मशास्त्र व शिक्षणशास्त्र अशा कठीणतम गणल्या गेलेल्या विषयांच्या ज्ञानसागरात त्यांनी मुक्त अवगाहन केले. आपल्या ज्ञातिबांधवांचे प्रबोधन करण्यासाठी तथा आधुनिक भारताच्या नवनिर्माणासाठी त्यांनी पत्रप्रपंचही केला.’ मूकनायक ‘, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता ‘ व ‘ प्रबुद्ध भारत ‘अशा नियतकालिकांतील प्रखर लेखनातून त्यांनी समाजतळ ढवळून काढला. याचबरोबर चित्रकला व संगीतकलेचेही ते भोक्ते होते . कृषी , जल व ऊर्जातज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेली कामगिरी विश्वभर गौरविली गेली आहे. त्यांनी मांडलेले सामुदायिक शेतीचे प्रयोगशील धोरण भारतीय शेतक- यांनी अवलंबिले , तर भारतात शेतकरी आत्महत्या घडणार नाही .
बारमाही वाहणा- या नद्यांचे पाणी हे दुष्काळग्रस्त राज्यांकडे ‘ नदी जोड प्रकल्पा’ च्या आधारे वळविण्याचे धोरणही त्यांनीच आखले होते.ते केवळ बहुभाषाकोविद होते, असे नसून ते मराठी, हिंदी, गुजराती , पाली , संस्कृत या भारतीय भाषांसवे इंग्रजी , पर्शियन व जर्मन परकीय भाषांचेही अभ्यासक होते . त्यांनी परिष्कृत केलेल्या विपुल ग्रंथसंपदेच्या सूक्ष्म परिशीलनातून हे प्रतीत होते. कामगार व महिलांच्या हिताप्रीत्यर्थ त्यांनी कायदे केले व त्या आधारे त्यांना न्याय मिळवून दिला.कामगारांच्या कामाच्या बारा तासांचे आठ तास त्यांनीच केले . स्त्रियांना पिता व पतीच्या संपत्तीत वारसा हक्क व पतीकडून घटस्फोट घेण्याचा हक्क त्यांनी केलेल्या कायद्यांमुळेच प्राप्त झाला आहे. त्यांनी आपल्या संपादित ज्ञानाच्या बळावर भारताची आधुनिक मूल्यांवर जडणघडण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
मला माझी इतिहासात विध्वंसक म्हणून नोंद करावयाची नाही , या मनोनिग्रहातून त्यांनी भारतीय मातीत जन्मलेल्या व जगाचा उद्धारक ठरलेल्या बुद्ध धम्माचा अनुग्रह घेतला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे राष्ट्रोद्धाराचे कार्य पाहिले म्हणजे ते महान राष्ट्रपुरुष होते , असे म्हणण्यास काहीही प्रत्यवाय नाही, असेही ते म्हणाले. आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलताना प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष भारतात पुन्हा जन्माला येणार नाही . त्यांनी केलेले समाजकारण , राजकारण, धर्मकारण व राष्ट्रनिर्माणक कार्य हे त्यांच्या महानतम व्यक्तिमत्त्वाची ग्वाही देण्यास पुरेसे आहे. त्यांच्या आचारविचारांचा आदर्श घेऊन वाटचाल केल्यास
आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळेल, यात संदेह नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.एस. इ. मुंडे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. काकासाहेब सुरवसे यांनी केले. प्रा.किरण लोमटे यांच्या आभारप्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगतां झाली. हा आंबेडकर जयंती समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापकवृंद,सांस्कृतिक मंडळांचे सर्व प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी, परिचारक वर्ग आदींनी विशेष परिश्रम घेतले. सुटीचा दिवस असूनही या समारंभाला सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी भहुसंख्येने उपस्थित होते.