
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
जालना, दि. 20 (जिमाका) :- अंबड तालुक्यातील पारनेर शिवारातील एका हॉटेलसमोर एक दिवसाचे पुरुष जातीचे नवजात बालक बेवारस अवस्थेमध्ये आढळून आले. या सापडलेल्या नवजात बालकाची माहिती अंबड पोलीस ठाण्यास समजताच या बालकाला ताब्यात घेऊन त्यास तातडीने उपचारासाठी जालना येथील महिला रुग्णालयात दाखल केले. सदरील प्रकरणाची माहिती जिल्हा महिला व बालविकास कार्यालयास मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.एन.चिमंन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे आणि सचिन चव्हाण यांनी महिला रुग्णालयात भेट देऊन बालकाच्या प्रकृतीची चौकशी केली.
बालकाची तब्येत ठीक असल्याची खात्री पटल्यानंतर बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पाऊले उचलण्यात येऊन बालकाच्या पुढील संगोपनासाठी भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद येथे प्रवेशित करण्याचे आदेश पारित करण्यात आले. भारतीय समाज सेवा केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा घुले आणि नर्स बालकाला घेण्यासाठी तातडीने जालन्यात दाखल होऊन बालकाला आपल्यासोबत घेऊन जात भारतीय समाज सेवा केंद्र औरंगाबाद येथे केले. यावेळी महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.आर.एच.पाटील, डॉ.कोकाटे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण, श्रीमती आर्दड,पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा घुले यांची उपस्थिती होती.
अशा प्रकारचे बालक आढळून आल्यास जवळील पोलीस ठाण्यास अथवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे यांनी केले आहे.