
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने या मनी लाँड्रिंग प्रकरणात ताब्यात घेतलं. तर याच प्रकरणी ईडीने नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता तात्पुरती जप केली आहे. ईडी आज उद्यात नवाब मलिकांविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता असताना नवाब मलिकांना ईडीने आणखी एक धक्का दिला आहे. नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांविरोधात समन्स पाठवण्यात आले असून ईडीकडून लवकरच चार्जशीट दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवाब मलिक यांचे पुत्र अमीर मलिक आणि फराज मलिक या दोघांना समन्स बजावण्यात आले आहेत. ईडीने अनेकदा समन्स बजावून देखील हे दोघे चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. ईडीने आतापर्यंत अमीर मलिक यांना दोन वेळेस तर फराज मलिक यांना तीन वेळेस समन्स बजावलं आहे. दरम्यान, ईडीने नवाब मलिक यांना त्यांच्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतलं व 23 फेब्रुवारी रोजी अटक केली. मनी लाँड्रिग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिकांना जोर का झटका देत ईडीने त्यांच्या मुलांनाही समन्स बजावले आहेत.