
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
कोल्हापूर :- राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरुय. महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा सामना रंगताना दिसतोय. त्यात आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. अनेकांची तोंडं एकाच पक्षात राहूनही वेगवेगळ्या दिशेला असतात. ते सर्व एकत्र आल्याशिवाय समन्वय साधता येणार नाहीय. सत्तेसाठी आसुसलेली माणसं सत्ता मिळत नाही, म्हणून वेगवेगळे उपद्व्याप करत आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावलाय.
खडसे पुढे म्हणाले, राज्यात दिवसेंदिवस आघाडी सरकार स्थिर होत आहे, त्यामुळं हे सरकार आता अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरुय. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय. त्यातच देवेंद्र फडणवीस यांचं उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असं झालंय. सत्ता कधी मिळवायची, यासाठी नवरा उतावळा झालाय, असा घणाघात त्यांनी केलाय.
सत्तेसाठी भाजपवाल्यांनी फोन टॅपिंग देखील सुरू केलंय. 67 दिवस माझा फोन टॅप केला. इतकी हलकट आणि नीच प्रवृत्ती मी राजकारणात पाहिली नाही. या राज्यात राष्ट्रपती राजवट आणावी आणि मागच्या दरानं सत्ता आणावी हा यांचा हेतू आहे, अशी टीका खडसेंनी भाजपवर केलीय. 2024 ला आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.