
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते आणि महामार्ग बांधणीच्या “आयडिया’ भन्नाट असतात. त्यातील बहुसंख्य कल्पना प्रत्यक्षात उतरतात. आता त्यांनी महाराष्ट्रात आणखी एक एक्स्प्रेस-वे बांधणीची घोषणा करून नेहमीप्रमाणे आश्चर्याचा धक्का दिला आहे. पुणे आणि औरंगाबाद या विकसित शहरांना जोडणारा हा महामार्ग असेल. या मार्गाबद्दल स्वप्न चांगले असेलही, पण ते क्षणभंगुर ठरू नये इतकेच!
उड्डाणपूल अजूनही हवेतच
वाघोलीपासून पुढे तळेगाव ढमढेरे आणि शिक्रापूरपर्यंत उड्डाणपूल उभारण्याची घोषणा यापूर्वी नितीन गडकरी यांनीच केली होती. त्यालाही आता 4 वर्षे होत आली आहेत. पण, त्या उड्डाणपुलासाठी अजून एकही वीट रचली गेलेली नाही. पर्यायाने वाहतूक कोंडी, वेळ आणि इंधनाची नासाडी कायम आहे. स्थानिक नेत्यांकडून पाठपुरावा आणि सहकार्य मिळत नसल्याने हे काम रखडल्याचे बोलले जात आहे.
बीडचा पर्याय का?
गडकरी यांनी सांगितल्यानुसार नवा मार्ग आता औरंगाबाद-पैठण-बीड-नगर-पुणे असा असू शकतो. तर, त्यासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बीड जिल्ह्याचा भाग या महामार्गात आल्यास तो भागही भरभराटीस येईल. पण, पैठण ते बीड आणि नगर जोडणे गैरसोयीचे आहे. त्यामुळे पैठण-पाथर्डी आणि नगर असा मार्ग झाल्यास तो सोयीचा असू शकतो. यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे सव्वा ते दीड तास कमी होईल.
सद्यस्थिती काय?
पुण्याहून नगर आणि पुढे औरंगाबाद जाण्यासाठी पुणे शहर, वाघोली, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भीमा, शिक्रापूर आणि रांजणगाव येथील वाहतूक कोंडीचे दिव्य पार पाडावे लागते. त्यातून निसटलो, तर नगरमध्ये अडकलो असेच समजा. त्यामुळे हा प्रवास कंटाळवाणा ठरतो.
पर्याय काय आणि कसे?
प्रस्तावित एक्स्प्रेस-वे हा नगरच्या पुढे सध्याच्या महामार्गाला समांतर असेल का? की आहे त्याच मार्गाचा विस्तार केला जाणार? याबद्दल माहिती अस्पष्ट आहे. तर, दोन्हीही पर्यायांसाठी भूसंपादन आणि त्याचा मोबदला हा प्रचंड खार्चिक आणि वादाचा मुद्दा ठरू शकतो. कारण, यातील बहुतांश भागांतील जमीन सुपीक आहे. शिवाय, पीएमआरडीए हद्द आता जवळपास रांजणगावपर्यंत आहे. एमआयडीसी आणि शेती यामुळे जमिनीचे भाव प्रचंड आहेत. त्यामुळे हा महामार्ग उभारणे घोषणा करण्याइतका सोपा नसेल.
रेल्वे नसल्याचा फटका
पुणे आणि औरंगाबाद ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख महानगरे आहेत. पण, या दोन शहरांना जोडणारी थेट रेल्वे अजूनही नाही. त्यामुळे सर्व भार रस्ते वाहतुकीवरच आहे. सध्याचा महामार्ग जो नगर शहरातून जातो, तो प्रचंड वेळखाऊ आहे. त्यामुळे 240 कि.मी. अंतर प्रवासासाठी खासगी वाहनाने 5, तर सार्वजनिक वाहनाने 6 तास खर्च करावे लागतात.
समृद्धी मॉडेल’ ठरेल उपयोगी
मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरू होत आहे. तो अशा भागांतून नेण्यात आला आहे, की तिकडे फारसा विकास झालेला नाही. त्यामुळे जमिनीचे भावही कमी होते. त्यामुळे शासनाला भूसंपादन फारसे कठीण गेले नाही. तोच फॉर्म्युला या नव्या एक्स्प्रेस-वेसाठी वापरल्यास तो किफायती ठरणार आहे. शिवाय, अविकसित भाग मुख्य प्रवाहात येणार आहे.