
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे पहिले अधिवेशन शिर्डी नगरीत पार पडले असून या अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले हा एक आनंददायी क्षण असल्याचे सांगून समाजाच्या परिवर्तनासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका, आपले ध्येय समोर ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करा, यश आपोआप मिळेल, निंदा करणाऱ्यांना करू द्या, टिका करणाऱ्यांना करू द्या, आरोप करणाऱ्यांना करू द्या, परंतु आपले समाजकार्य सोडू नका
असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिर्डी नगरीत केले.
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने दिनांक २४ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या जिल्हा कार्यकारी मंडळाच्या पहिल्या अधिवेशनात ते बोलत होते. या प्रसंगी आमदार समीर कुणावार, आंध्रप्रदेश पर्यावरण व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष गुब्बा चंद्रशेखर, काशी अन्नपूर्णा नित्यांन्न सत्रमचे सचिव बच्चू विलास गुप्ता, महासभेचे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष नंदकुमार गादेवार, सचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदास वट्टमवार, कोषाध्यक्ष अनिल मनाठकर, दिलीप कंदकुर्ते, एकनाथराव मामडे, शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, महिला अध्यक्षा सौ माधुरी कोल्हे, सौ सुलभा वट्टमवार, सूर्यकांत शिरपेवार, उपाध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, सुधीर पाटील, जयंत बोंगीरवार,नगरसेवक संजय पांपटवार, राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रारंभी श्री वासवी माता कन्यका परमेश्वरी, ह-भ-प रंगनाथ महाराज परभणीकर, साई बाबांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. स्वागतगीत प्राची कोटलवार यांनी सादर केले तत्पूर्वी आर्य वैश्य बीड महिला पदाधिकाऱ्यांनी वेंकटेशा श्रीनिवासा या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
महासभेचे सचिव गोविंदराव बिडवई यांनी प्रास्ताविक भाषणात महासभेचा इतिहास व महासभेची यशस्वी वाटचाल या विषयीची माहिती सांगितली.स्वागताध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची ध्येयधोरणे या विषयी माहिती सांगितली. संपूर्ण महाराष्ट्रात गावागावात महासभा पोहचविणे हा एक उद्देश असून महासभेच्या माध्यमातून आपण समाजहित जोपासण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महासभेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती सांगताना समाजाची जनगणना समाजबांधवांचा विमा, समाज संघटीत करण्यासाठी समाज कनेक्ट योजने विषयीची माहिती दिली.
आर्य वैश्य महासभेच्या वतीने शिर्डी नगरीत घेतलेल्या पहिल्याच अधिवेशनाला अलोकिक प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश,तेलगाना, तामिळनाडू, विदर्भ राज्यातील शेकडो पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते. महासभेच्या या अधिवेशनाने नव चैतन्याची नांदी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांचे कार्य कौतुकास्पद आहे. अल्पावधीतच त्यांनी महासभेच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा घेऊन तळागाळातील समाज बांधवांना न्याय देण्याचे काम केले आहे.
चांगले काम करीत असताना विरोध होतोच, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपले काम करत रहावे यश आपोआप आपल्या पर्यंत पोहोचेल असे हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितले आहे. याप्रसंगी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली आहेत समाज हिताच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेने केलेल्या कार्याचा गौरव अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून केला आहे. या अधिवेशनाला महिलांची विशेष उपस्थिती लाभली होती.