दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. तर राज्यात शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर असणाऱ्या पुणे विद्यापीठाचा कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने चालत असल्याचे चित्र आहे.
पुणे विद्यापीठात येत्या ३१मे रोजी १८ शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यात उपकुलसचिव, कक्षाधिकारी, लेखनिकाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ४ प्राध्यापक निवृत्त होत आहेत. विद्यापीठातील एकूण २२ जण एकाच दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, उच्च शिक्षण क्षेत्रात शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेस राज्य शासनाकडून अद्यापही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी नाही. प्रशासकीय कामकाजास गती मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
सद्य:स्थितीत पुणे विद्यापीठात जवळपास ४८५ शिक्षकेतर पदे रिक्त असल्याची माहिती पुणे विद्यापीठाकडून देण्यात आली. पुणे विद्यापीठात २०१४ मध्ये एकूण २१० पदांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली होती.