दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी-किशोर वाकोडे
बुलडाणा: दि.१.
पेरणीच्या तोंडावर कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. तुम्हाला डीएपीचे खत घ्यायचे असेल तर आणखी एक दुसरे खत घ्यावेच लागेल असा तगादा लावून शेतकऱ्यांची आर्थिक लुट करण्याचा धंदा कृषी केंद्र संचालकांनी लावला आहे.बुलडाण्यातील एका शेतकऱ्याने यासंबंधीची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांडे केली. त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले. आज १ जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास बुलडाणा शहरात हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा शहरातील बसस्थानकाजवळ असलेल्या सागर सीड्स या कृषी केंद्रात शेतकऱ्यांना डीएपी खत घ्यायचे असेल तर आणखी दुसरे खत घ्यावेच लागेल अन्यथा खत मिळणार नाही असा तगादा लावण्यात येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना एक खताची थैली घ्यायची असेल तर त्यामागे ८०० रुपये अधिकचे मोजावे लागत होते. बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी येथील शेतकरी अजय शेवाळे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तालुका कृषी अधिकारी दिनकर मेरत शेतकऱ्यासोबत कृषी केंद्रावर पोहचले. त्यानंतर शेतकऱ्याने खताची मागणी केली असता तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या समक्ष शेतकऱ्याला आणखी दुसरे खत घ्यावेच लागेल अशी तंबी कृषी केंद्र चालकाने दिली. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी स्वतःचा परिचय दिल्यावर मात्र दुकानदाराची बोबडी वळली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असा शब्द यावेळी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. शेतकऱ्यांची लूट होत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले.