
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. यातच मंगळवार दि. २१ जून रोजी दुपारी पाचच्या सुमारास शेतावर काम करणाऱ्या तीन मजुरांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाळज तालुका भोकर शिवारात पाचच्या सुमारास घडली.
पाळज तालुका भोकर येथील रहिवासी साईनाथ सातमवार (वय 30), राजेश्वर सतलावार (वय 40) आणि बोजन्ना रामनवार (वय 32) हे तिघे जण पाळज शिवारात एका शेतामध्ये काम करत होते. यावेळी अचानक ढग दाटून आले. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पाऊस पडू लागला. तिघे मजूर एका झाडाखाली थांबले. दुपारी पाचच्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते तिघेही जागीच ठार झाले.
ही माहिती मिळताच भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे व त्यांचे पथक, पोलीस निरीक्षक विकास पाटील व त्यांची टीम यासह गावातील पोलीस पाटील, सरपंच यांसह शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या तिन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भोकर रुग्णालयात पाठविले आहे.