
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा यांनी बंडखोर आमदारांना संरक्षण देणार असल्याचे काल सकाळी स्पष्ट केले. यानंतर त्यांनी शिंदे गटातील आमदारांबराेबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
एकीकडे शिवसेना बंडखाेर आमदारांविराेधात कारवाईचा इशारा देत असतानाच अमित शहा यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
काल एकनाथ शिंदे यांची भाजपचे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. यावेळी शिंदे गटाच्या अपात्रतेविषयी शहांनी चर्चा केली. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये आमदारांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. यानंतर शहा यांनी सर्व बंडखाेर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला.
शिवसेनेच्या बंडाळीने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने आता राजकीय नाही तर कायदेशीर लढाई सुरू केली आहे. शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांना सोमवारी ५ .३० वाजेपर्यंत बाजू मांडण्यास मुदत देण्यात आली आहे. तसेच विधानसभा उपाध्यक्षांकडे कारवाईचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.