
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे, दि. १: बिहारमधील प्रशासकीय सेवेतील उपजिल्हाधिकारी संवर्गाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यादरम्यान पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राबवण्यात येत असलेल्या अभिनव उपक्रमांची तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीबाबत माहिती पथकाला दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे, पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन विकास प्रबोधिनीचे (यशदा) प्रविण प्रशिक्षक आर. टी. दिघडे आदी उपस्थित होते.
राज्यात राबवण्यात येत असलेल्या ऑनलाईन अर्धन्यायिक पोर्टल (ई-क्यूजे कोर्ट) उपक्रमाबाबत श्री. देशमुख यांनी माहिती दिली. महाराष्ट्रात महसूली कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून असे उपक्रम उपयुक्त ठरत आहेत. पुणे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाने याच्या एक पाऊल पुढे जात या उपक्रमाशी जोडलेले मोबाईल ॲप विकसित केले असून त्याद्वारे महसूली अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावणीच्या तारखा, वेळा याबाबतची माहिती थेट मोबाईलवर मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाचत असून प्रकरणे गतीने निकाली काढणे शक्य झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री. कदम यांनी सादरीकरणाद्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या सुरु असलेल्या कामाबद्दल माहिती दिली. श्री. सोनवणे यांनी सादरीकरण करुन पुणे मेट्रोची वैशिष्ट्ये, त्यामध्ये राबवण्यात येत असलेल्या अभिनव उपक्रमांची माहिती दिली. भूसंपादन अधिकारी श्री. साळुंखे यांनी पुणे शहराभोवती राबवण्यात येत असलेल्या रिंग रोड प्रकल्पाची तसेच पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची माहिती यावेळी दिली.
यावेळी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेल्या पंढरपूर आषाढी वारीबाबत चित्रफीत दाखवण्यात आली.