दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करोना लसीकरण मोहीम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करणार असल्याचं जाहीर केलं आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी अमित शाह यांच्या भेटीसाठी मंगळवारी संसदेत पोहोचले होते.
अमित शाह यांच्या भेटीनंतर सुवेंदू अधिकारी यांनी अमित शाह यांनी हे आश्वासन दिलं असल्याची माहिती दिली.
सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी संसद भवनात अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील भाजपाच्या कामकाजाबाबत तसंच समस्यांबाबत चर्चा केली. या भेटीनंतर बोलताना सुवेंदू अधिकारी यांनी, अमित शाह यांनी करोना लसीकरण मोहीम संपल्यानंतर प्रलंबित असलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाईल असं आश्वासन दिल्याची माहिती दिली.
सुवेंदू अधिकारी यांनी या भेटीत अमित शाह यांच्यासमोर सत्ताधारी तृणमूल काँग्रेससोबत सुरु असलेल्या राजकीय लढाईसंबंधीही अनेक मुद्दे मांडले. आपण अमित शाह यांच्याकडे भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई कऱण्यासाठी तृणमूलच्या १०० नेत्यांची यादी दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
११ डिसेंबर २०१९ ला संसदेत सीएए संमत करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी अधिसूचना जारी करण्यात आली. केंद्र सरकारने अद्याप कायद्यासाठीची नियमावली तयार केलेली नाही. अनेक विरोधी पक्षांनी सीएएला विरोध केलेला असतानाही, अमित शाह यांनी याची अमलबजावणी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.