दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी :केंद्रे प्रकाश
प्रदर्शनादरम्यान तीन दिवस मोफत कोविड-19 लसीकरण शिबीर
गोवा :- केंद्रीय संचार ब्युरो आणि कोकण रेल्वेच्या सहकार्याने स्वातंत्र्यदिन आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यानिमित्त मडगाव रेल्वे स्थानकावर 05 ते 07 ऑगस्ट दरम्यान मल्टीमिडीया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास या प्रदर्शनातून मांडण्यात येणार आहे.
यादरम्यान आरोग्य संचालनालयाच्या सहकार्याने मोफत कोविड-19 लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात विशेषतः खबरदारीची मात्रा देण्यात येणार आहे.
मल्टीमिडीया प्रदर्शन आणि लसीकरण शिबीराचे मडगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म 1 वर शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता कोकण रेल्वेच्या कारवार विभागाचे जनरल मॅनेजर बी बी निकम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कोकण रेल्वेच्या नियोजन आणि व्यवसाय विकास विभागाचे जनरल मॅनेजर जे ई जॉर्ज यांची याप्रसंगी उपस्थिती असणार आहे.