दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई, 8 ऑगस्ट : सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला होता.
याबाबात शिवसेनेकडून विधान परिषदेच्या सभापतींना पत्रही पाठवण्यात आले आहे. शिवसेनेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसही यासाठी स्पर्धेत आहे. विधानपरिषदेत शिवसेनेकडे 11 सदस्य आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 10-10 सदस्य आहेत.
यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती करुन विरोधीपक्षनेतेपदासाठी दावा करु शकतात, असं बोललं जात होतं. मात्र, आता विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे जाणार असल्याचं दिसत आहे. कारण, यावर विधान परीषद आमदार अंबादास दानवे यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते करतील अशी चर्चा होती.
मात्र, आता आमदार अंबादास दानवे यांना हे पद देण्यात येणार असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पक्षात बंडखोरी झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर सातत्याने हल्ला चढवला आहे. त्यामुळे आता सभागृहातही असाच आक्रमक चेहरा देण्याचा विचार पक्षाने केला असण्याची शक्यता आहे. शिवाय शिवसेनेला सर्वात मोठा धक्का मराठवाड्यात बसला आहे.
त्यामुळे याच मराठवाड्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी दानवे यांच्या नावाला पसंती दिली असण्याची शक्यता आहे.