दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेके
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली आ. कि.जोरगेवारांनी भेट
घुग्घुस :- चंद्रपूर जिल्ह्याच्या धानोरा गावाजवळील वर्धा नदीवर पुल बांधण्यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी वाहतुक व राजमार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. आमदार जोरगेवार यांनी नागपुर येथे ना. गडकरी यांची भेट घेत त्यांचे कडे सदरहु मागणी केली आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या धानोरा या गावातील वर्धा नदीवर कमी उंचीचा पुल आहे. सदरहु पुल गडचांदुर, कोरपना, यासारख्या सिमेंट उद्योग असलेल्या महत्वपुर्ण गांवाना जोडतो. मात्र चंद्रपूरात आलेल्या पुरात सदर पुल हा २६५ तास पाण्याखाली गेला होता. त्यामुळे हा पुल क्षतिग्र्रस्त झाला आहे. या पुलावरून होणारी वाहतूक धोकादायक ठरु शकते. त्यामुळे नागरिकांना वाहतुक सुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टिने येथे उंच पुल तयार करण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
सदरहु पुल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात नदीचे पाणी पुलावरून वाहते. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटतो या सर्व बाबींचा गार्भिंयाने विचार करुन येथे उंच पुल बांधण्यात यावा अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली आहे. दरम्यान त्यांनी नागपुर येथे वाहतुक व राजमार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असुन सदरहु पुलाच्या बांधकामासाठी ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. यावेळी सदर मागणी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. या शिवाय मतदार संघातील इतर महत्वांच्या विषयांवरही आमदार जोरगेवार यांनी ना. नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे.