दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
श्रावणाची चाहुल नुकतीच त्याच्या सोनपावलांनी जाणवू लागली होती, ही तर सुरवात होती. अजून अख्खा श्रावण आनंदमय वातावरणात, भजन कीर्तनात दंग व्हायचा होता. चिपळ्यांचा नाद, झांजांचे आवाज, मृदुंगावरची थाप, असं भक्तिमय वातावरण भारून कान तृप्त व्हायला अन मन आनंदी व्हायला सुरवात झाली होती. निसर्गसुंदर अविष्कारात अवधी सृष्ठी नटायला लागली होती, मातीच्या मळलेल्या पायवाटांवरून चालताना असंख्य रंगीबेरंगी रानफुले उमलून लक्ष वेधून घेत होती. हिरव्या पोपटी सौभाग्याचा मंत्र साऱ्या चराचरात गुंजत होता, सूर्य किरणांची कोमल चंदेरी झळाळी आल्हाददायक वाटत होती. कधी कधी तर आसमंतात मनमोहक सप्तरंगी इंद्रधनु मन वेधून घेत होता. वृक्षावृक्षांवर, लतावेलींवर, झुडूपा झुडूपांवर फुलांच्या ओंजळी बहरून वहात होत्या. खळाळणाऱ्या झऱ्या झऱ्यातून उमटणारा दिडदा दिडदा झंकार तालावर, ठेक्यावर पुढे पुढे अलवार सरकत होता. पक्षांची लगबग घरटी बांधण्यात अन संसार वाढविण्यात आनंदे गुंतला होता. मोरांचा केकारव भल्या सक्काळी जाग आणत होता. निळ्या निळ्या नभावर विविध पक्षांचा विहंग संचार रांगोळीसम भासत होता. श्रावण सरींची बरसात कधी मंद लयीत तर कधी दृत लयीत ताला ठेक्यांवर बरसत होती, अन मंदसा हवाहवासा गारवा जाणवू लागला होता.
किती सण किती उत्सव ददात नाही त्यांना ………. असा तू श्रावण. आज अखेरचा दिवस, दर्श अमावास्या, पिठोरी अमावास्या, पोळा, जिवंतिका पूजन, अश्वथ्थ मारूती पूजन अन सोबत मातृदिनही ! हे सारं सारं मिळवायला, उपभोगायला, त्यातला मनमुराद आनंद प्राप्त करायला आता चक्क एक वर्ष वाट पहावी लागणार, तोपर्यंत श्रावणा तुझ्या या आठवांतच सारे दिवस, सारे महिने काढावे लागणार, हो ना? तूला निरोप देणेच कित्ती जड झालेय रे. घन नीळा बरसणारा तू, श्रावण मासी हर्ष मानसी तू, धरतीच्या कलशात रिमझिम बरसणारा तू, मयुरा फुलवित ये रे पिसारा असा मोरांना साद घालणारा तू, तुझ्या रिमझिमणाऱ्या सरींमधून चांदीची थेंब फुले गळतात असा तू, थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा असा बाळगोपाळांचा तू, रिमझिम गिरे सावन म्हणजे तू, मेरे नैना सावन भादो म्हणजे तू. अरे तू कुठे नाहीस ? सारे चराचर व्यापून तू अन त्या चराचरातून बाहेर पडून तुझं वेगळं अस्तित्व असणारा त्या कृष्णासारखा तू ! ! ! बस्स आता डोळे भरून तुझी वाट पहायची एवढंच उरलं आहे बघ.
®️ सुनील चिटणीस
२६ ऑगस्ट २०२२
अमावास्या