दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
राजकोट – गुजरातमध्ये वर्षाअखेरीस विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यात आम आदमी पार्टीने प्रचाराला वेग दिला आहे. यामुळे भाजप आणि आप यांच्यात राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या कार्यकर्तांना आपसाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी भाजपमध्येच राहा पण आपसाठी काम करा, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांनी आज राजकोटमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुजरामधील भाजप कार्यकर्त्यांना हे आवाहन केले.
*अरविंद केजरीवाल यांचे सवाल* –
यावेळी त्यांनी आम्हाला भाजपचे नेते नकोत. त्यांनी ते त्यांच्या जवळ ठेवावेत. भाजपचे जेवढे पन्नाप्रमुख आहेत, कार्यकर्ते आहेत, गावागावांमधील आणि मतदान केंद्रवरील भाजप समर्थ आमच्याशी जोडले जात आहेत. यात अनेक लोक फार चांगले आहेत. त्यांना मी आवाहन करतो. तुम्ही एवढ्या वर्ष भाजपची सेवा केली, तुम्हाला काय मिळाले? यांनी तुमच्या मुलांना शाळा दिल्या? तुमच्यासाठी रुग्णालये बांधली का? तुमच्या घरामध्ये कोणी आजारी पडल्यावर उपाचारांसाठी जमीन किंवा दागिने गहाण टाकावे लागतात की नाही? तुम्हालाही विजेची मोठी बिले द्यावी लागतात की नाही? असे अनेक प्रश्न केजरीवाल यांनी मतदारांना विचारले.
*दिली ही आश्वासने* –
आमच्याकडे तुम्हाला देण्याशी पैसे नाहीत तर पैसे तुम्ही भाजपकडून घ्या काम मात्र आमच्यासाठी करा, असेही केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मी तुम्हाला या साऱ्यांचे आश्वासन देतो. तुम्हाला भाजपा सोडायची गरज नाही. तुम्ही भाजपामध्ये राहा. काम आमच्यासाठी म्हणजे आपसाठी काम करा. अनेकांना ते पैसे देतात. पैसे त्यांच्याकडूनच घ्या. आमच्याकडे पैसे नाहीत. आमचे सरकार आले की आम्ही तुम्हाला मोफत विज देऊ, मी तुम्हाला 24 तास मोफत वीज देईन तुमच्या मुलांसाठी चांगल्या शाळा उभारीन. मी मोफत शिक्षण देईन. मी तुमच्या कुटुंबाला मोफत आणि उत्तम आरोग्य सेवा देईन. मी तुमच्या घरातील महिलांना एक एक हजार रुपये देईन, असे केजरीवाल म्हणाले.
नितीन गडकरींनी ही केले होते असे आवाहन –
१५ ऑक्टोबरच्या मतदानापर्यंत तुमच्या नशिबी ‘लक्ष्मीदर्शना’चा योग आहे. येणाऱ्या लक्ष्मीला नाकारू नका, असे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी मतदारांना 2014 साली आवाहन केले होते. त्यांनी हे आवाहन लातूर येथील सभेत बोलताना केले होते. निवडणूक आयोगाने याबाबत नितीन गडकरी यांना नोटीस काढली होती.