दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-
घुग्घुस येथील अमराई वार्डातील स्थलांतरित कुटुंबियांकडे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी पाठ फिरविली आहे
घूग्घूस
गुरुवार ८ सप्टेंबर रोजी चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर हे घुग्घुस येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१ चंद्रपूर केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सन २०२१-२२ घुग्घुस-म्हातारदेवीच्या दोन पदरी व चौपदरी सिमेंट काॅंक्रीट रस्त्याच्या भूमीपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आले होते.
घुग्घुस येथील भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम संपताच ते निघून गेले. घुग्घुस येथे खासदार बाळूभाऊ धानोरकर हे दौऱ्यावर आले परंतु त्यांनी जि.प. शाळेत व इतरत्र स्थलांतरित असलेल्या कुटुंबियांची साधी भेट सुद्धा त्यांनी घेतली नाही. त्यामुळे स्थलांतरित कुटुंबियांनी आक्रोश व्यक्त केला आहे.
२६ ऑगस्ट रोजी अमराई वार्डातील एक घर भुस्खलना मुळे शेकडो फूट जमिनीत गेले. त्यामुळे सुरक्षेकरीता १६० कुटुंबियांना जि.प.शाळेत व इतरत्र स्थलांतरित करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी बैठक घेतली. सहा महिने ३ हजार रुपये घरभाडे वेकोलि देणार, राहण्याकरीता जमिनीचे स्थायी पट्टे, घरे बांधण्यासाठी शासन मदत करणार सदर मागण्या खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याने घुग्घुस काँग्रेसच्या नेत्यांनी फटाके फोडून जल्लोष केला होता.
परंतु सदर मागण्या लिखित देण्याची मागणी करीत स्थलांतरित कुटुंबियांनी ३ हजार रुपयाची मदत घेण्यास नकार दिला होता.
जवळपास १४ दिवसाचा कालावधी लोटून सुद्धा आता पर्यंत सदर मागण्या प्रशासनातर्फे लिखित देण्यात आलेल्या नाही.
खासदार बाळूभाऊ धानोरकर हे घुग्घुस दौऱ्यावर येत असल्याने स्थलांतरित कुटुंबियांना सदर मागण्या लिखित मिळणार अशी आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी स्थलांतरित कुटुंबियांकडे पाठ फिरविल्याने. स्थलांतरित कुटुंबियांनी आक्रोश व्यक्त केला आहे.