दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
_खुलताबादचे गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना पाठवले पत्र.._
काही दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी केली होती. आता प्रत्यक्षात कारवाईला सुरवात झाली आहे.
खुलताबादचे गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना पाठवलेल्या पत्रामध्ये सप्टेंबर 2022 च्या पगार प्रणालीमध्ये घरभाडे भत्ता समाविष्ट करू नयेत असे निर्देश दिल्याने मोठी खळबळ उडाली असून शिक्षक संघटनांनी या आदेशाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
काय आहे गटशिक्षणाधिकारी यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये?
गटशिक्षणाधिकारी यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, शासन निर्णयाप्रमाणे शिक्षकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असून प्रशांत बंब यांनी पाठवलेल्या पत्रानुसार तालुक्यातील कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने तक्रारी प्राप्त झाली आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांनी मुख्यालयी राहणे बाबत अद्याप पर्यंत पुरावे सादर केलेले नाही. त्या शिक्षकांना घरभाडे भत्ता अदा करण्यात येऊ नये. तरी मुख्याध्यापक यांनी संबंधीताचे माहे सप्टेंबर 2022 चे पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठवितांना घरभाडे भत्ता समाविष्ट करु नयेत. तसेच मुख्यालयात राहत नसलेबाबत निदर्शनास आल्यास नियमानुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. तर चुकीची माहिती देणारे मुख्याध्यापक यास स्वतः सर्वस्वी जबाबदार राहतील यांची गांभीर्याने नोंद घ्यावी. सोबतच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समिती कार्यालयास तात्काळ सादर करावा…