दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे : हिश्याची जमीन विकून त्याचा मोबदला दिला नाही. तसेच खोट्या तक्रारी करण्यात आल्या. या त्रासाला कंटाळून एका ४० वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली. महादेव मधुकर कोद्रे वय ४० रा. माळीनगर, माळसिरस, जि. सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले. याप्रकरणी प्रमिला महादेव कोद्रे वय ४० यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन वसंत अनंत कोद्रे रा. हडपसर व संभाजी जगन्नाथ कणसे रा. धनकवडी यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी प्रमिला कोद्रे यांचे वसंत कोद्रे हे भावकीमध्ये दीर आहेत. वसंत आणि त्याचा मित्र संभाजी कणसे यांनी संगनमत करून महादेव कोद्रे यांच्या हिश्यावर आलेली मुंढवा येथील जमीन विकली. त्याचा मोबदला म्हणून ९९ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, हा धनादेश परत आला. याबाबत महादेव कोद्रे यांनी विचारणा करूनही पैसे आले नाहीत. त्यामुळे महादेव यांनी नैराश्यातून आत्महत्या केली.