दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनीही त्यांना परवानगी दिल्याचे संकेत मिळत आहेत
कॉंग्रेस अध्यक्ष निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी भूमिका थरूर यांनी काही काळापासून लावून धरली आहे. तेव्हापासूनच ते निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे मानले गेले. अशातच तरूण कॉंग्रेसजनांच्या एका गटाने जारी केलेल्या निवेदनावर थरूर यांनीही शिक्कामोर्तब केले.
कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर विधायक आणि व्यापक सुधारणा व्हाव्यात. त्या सुधारणांची ग्वाही अध्यक्षपद निवडणुकीतील उमेदवारांनी द्यावी, अशी आग्रही मागणी त्या निवेदनातून करण्यात आली आहे. त्या निवेदनाला मान्यता दिल्यानंतर थरूर यांनी सोमवारी येथे सोनियांची भेट घेतली. त्या भेटीतील चर्चेचा तपशील समोर आला नाही. मात्र, पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास थरूर यांना सोनियांनी हिरवा कंदील दाखवल्याची बातमी एका वाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केली.
कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 24 ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकणार आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी 8 ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर बिनविरोध न झाल्यास 17 ऑक्टोबरला निवडणूक होईल. त्या निवडणुकीच्या निकालामुळे (19 ऑक्टोबर) नवा अध्यक्ष कोण ते समोर येईल.