दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जळगाव : शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने ही कामे केली गेली असल्याचे सांगताना त्यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मान ठेवून आम्हाला साथ दिलेली असल्याने ते एक सच्चे शिवसैनिक आहेत असे निक्षून सांगितले. गुलाबराव यांनी पाणीपुरवठा विभागाचे मंत्री म्हणून त्यांच्या आधीच्या आणि आताच्या कार्यकाळात अनेक पाणी पुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन केले. मी स्वतः त्यांचा चाहता असून त्यांचं वक्तृत्व इतरांपेक्षा सरस असल्याने आणि तरुणांना भुरळ पडणारे असल्याने त्यांना दसरा मेळाव्यात बोलू दिले नाही. मात्र आपण असा अन्याय त्यांच्यावर कधीही होऊ देणार नाही असे त्यांच्या मतदारांना आवर्जून सांगितले. मुख्यमंत्री म्हणून आपण कायमच गुलाबरावांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हे देखील याप्रसंगी स्पष्ट केले.
यावेळी धरणगाव उप जिल्हा रुग्णालयाला मंजुरी देऊ, २२ कोटींच्या सोलरद्वारे पाणीपुरवठा करणारी योजना वेगाने पूर्णत्वास नेऊ, पाळधी येथे नवीन पोलीस स्थानक उभारणे, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उद्यान स्मारक उभारणे, बहिणाबाई चौधरी आणि बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे स्मारक उभारणीसाठी निधी देऊ, तसेच एसटी कामगारांचे प्रश्नही सोडवू असे सांगून त्यांना आश्वस्त केले.
याप्रसंगी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव आबा पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार राजू भोळे, अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक तसेच स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.