दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
कर्जत :
इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक , सेवानिवृत्त प्राध्यापक व Learn to enjoy English या पुस्तकाचे लेखक सुहास पटवर्धन महाराष्ट्रातील दुर्गम ग्रामीण भागातील शाळांना स्वेच्छेने भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती कमी व्हावी व त्यांना इंग्रजी विषयाची गोडी लागावी म्हणून विनामूल्य मार्गदर्शन करीत असतात. अलीकडेच त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या दहिवली ( तालुका – कर्जत ) शाळेतील ५ वी ते ७ वी तील एकूण ५० विद्यार्थ्याना एकत्रितपणे इंग्रजी विषयाचा अभ्यास कसा करावा याचे एक तास हसतखेळत मार्गदर्शन केले.लिखाण हा अभ्यासातील महत्वाचा घटक असल्याने विद्यार्थ्यांनी लिखाणाचा अधिकाधिक सराव करावा. लिखाणात वाचत अपरिहार्यपणे अंतर्भूत असतेच. लिखाणामुळे हस्ताक्षर सुधारते, स्पेलिंग लक्षात राहते, उत्तरात अचूकपणा येतो, लिखाणाची गती वाढते. परिणामी आत्मविश्वास वाढतो व परीक्षेची भीती वाटत नाही हे पटवर्धन सरांनी सहज सोप्या शब्दात विद्यार्थ्याना समजावून सांगितले. वर्ग संपताना विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे I like English, I love English व I enjoy English म्हटले.
मुख्याध्यापक श्री. पाटील सर व सहकारी शिक्षकांनी पटवर्धन सरांच्या निरपेक्ष सेवाभावी कार्याबद्दल त्यांचे आभार मानले व त्यांना शुभेच्छा दिल्या.सहाय्यक शिक्षक श्री. साबळे यांच्या विशेष प्रयत्नाने मार्गदर्शन वर्ग उत्तम प्रकारे संपन्न झाला.