दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गटात नावांमुळे नवीन ट्वीस्ट आला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या नावांमधील काही नावे सारखीच आहेत.
त्यामुळे आता निवडणूक आयोग आज काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नवीन नाव आणि पक्षचिन्ह यांचे तीन-तीन पर्याय द्यायला सांगितले होते. निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर उद्धव ठाकरे गटाने तीन नावे आणि तीन चिन्ह निवडणूक आयोगापुढे सादर केली आहेत.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमधून या तीन नावांबाबत आणि पक्षचिन्हाबाबत माहिती दिली. तसेच आता एकनाथ शिंदे गटाने दिलेल्या नावांबाबतची माहितीही समोर आली आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे देण्यात आली आहेत. तर एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला दोन नावांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. यातील एक नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे नाव शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, असे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हे चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत. शिंदे गटाकडून चिन्हाबाबत कोणते पर्याय देण्यात आले आहेत, याबाबत अजून गुप्तता पाळण्यात आली आहे. अंधेरीची पोटनिवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला दोन्ही गटांना लवकरात लवकर नवीन नाव आणि चिन्ह द्यावे लागणार आहे.