दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
तेलंगणा राज्यातील आडेली देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना घेवून जाणाऱ्या ऑटो चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली. या घटनेत नागेश रामा टारपे ( वय १९ वर्षे), बालाजी पांडुरंग खोकले (वय १९ वर्षे) या दोन भाविक तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर ११ जखमी झाले असून यात दोघे गंभीर आहेत. ही घटना घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील झळकवाडी घाटात
घडली.
या अपघातात जखमी झालेल्या
भाविकांमध्ये सुनील रामा टारपे,
विशाल चंद्रकांत टारपे, विजय सुरेश टारपे, शंकर डुकरे, वसंत डुकरे, गणेश कोतवाल, संजय सुरेश टारपे, मारुती बॉबले व ऑटो चालक गणेश सुरेश गवले यांचा समावेश आहे. सदरील सर्व भावीक बोधडी येथील रहिवासी आहेत. सर्व भाविक ऑटो क्रमांक एपी २५ डब्ल्यू ८४ ९३ या ऑटोने तेलंगणा राज्यातील आडेली या देवीचे दर्शन घेण्यासाठी बोधडीहून झळकवाडी मार्ग आडेली येथील
देवीचे दर्शन घेण्यासाठी जात होते. दरम्यान झळकवाडी घाटामध्ये हा अपघात झाला. सदरील घटनेची माहिती स्थानिकांनी शिवणी येथील भाजपाचे बालाजी आल्लेवार गजानन बच्चेवार, जब्बार शेख,
रूपेश जयस्वाल, विठ्ठल नारदकर यांना दिली. त्यानंतर जखमींना शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यू.ए. पोघे, डॉ. सौरभ हाणवते,
डॉ. वाडेकर, डॉ. सुशील यांनी जखमींवर उपचार करून पुढील उपचारासाठी दोघांना किनवट येथे पाठवले. इस्लापूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख अनवर, पोलीस नाईक संदीप साळवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात मयतांचे पंचनामे करून पुढील शवविच्छेदन प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली होती. घटनास्थळावर ज्या ऑटोचा अपघात झाला त्या ठिकाणाहून ऑटो मात्र पंचनामा करण्या अगोदरच गायब करण्यात आला होता.