दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी – माधव गोटमवाड
न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं आजच्या सामन्यात टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगचं आमंत्रण दिलं होतं. ढगाळ वातावरण आणि पाऊस अशा वातावरणाचा फायदा घेण्याचा किवी कॅप्टनचा प्लॅन होता. पण भारतीय फलंदाजांनी हा प्लॅन उधळून लावला. किवींवर आक्रमण चढवलं ते सूर्यकुमार यादवनं.
भारताची सुरुवात ठिकठाक झाली. ईशान किशन चांगल्या लयीत दिसत होता. पण पंत अगदी स्वस्तात 13 चेंडूत 6 धावा करुन बाद झाला. मग सूर्यकुमार फलंदाजीला आला आणि त्यानेही फटकेबाजी सुरु केली. तितक्यात ईशान किशन 36 धावा करुन बाद झाला. श्रेयस अय्यर आणि हार्दिक यांनीही प्रत्येकी 13 धावा केल्या. पण सूर्युकमार मात्र तोवर तुफान फॉर्मात आला होता. तो चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत होता. 49 चेंडूत त्याने शतक पूर्ण केलं. भारत 200 पार जाईल असं वाटत होतं. पण अखेरच्या षटकात भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या टीम साऊदीनं हॅट्रीक घेतली.
सूर्यानं पहिल्या बॉलपासून किवी फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. त्याच्या नाबाद 111 धावांच्या इनिंगमुळे भारताला धावांचा 191 डोंगर उभारता आला. सूर्याच्या या इनिंगमध्ये तब्बल 11 फोर आणि 7 सिक्सर्सचा समावेश होता.
सूर्यकुमार यादव सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे.
सूर्यकुमार यादव च्या 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1100 धावा पूर्ण झाल्या आहेत.
आज माऊंट माऊंगानुईच्या बे ओव्हल मैदानावर सूर्यकुमारने जबरदस्त बॅटिंग केली. सहज फलंदाजी करताना त्याने मैदानाच्या चारही दिशांना फटकेबाजी केली.कव्हर, थर्डमॅन, फाइन लेगला सूर्याच्या बॅटमधून क्लासिक फटके पहायला मिळाले. आज बे ओव्हलवर सूर्याची बॅटिंग पाहण क्रिकेट रसिकांसाठी एक मेजवानी होती.
भारताने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले होते प्रत्युत्तरात आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या टीमने भारतीय बॉलर्ससमोर सपशेल नांगी टाकली.
यजमानांना भुवनेश्वर कुमारने दुसऱ्याच चेंडूवर धक्का देताना फिन अॅलन भोपळ्यावर बाद केले. डेव्हॉन कॉनवे व कर्णधार केन विलियम्सन या दोघांनी ५६ धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडचा डाव सावरला. पण, वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात कॉनवे २५ धावांवर झेलबाद झाला. ग्लेन फिलिप्स आक्रमक खेळ करण्याच्या पवित्र्यातच मैदानावर उतरला होता. पण, युजवेंद्र चहलने संथ चेंडू टाकून फिलिप्सचा ( १२) त्रिफळा उडवला आणि किवींना ६९ धावांवर तिसरा धक्का दिला. दीपक हुडा, युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर टिच्चून मारा करताना किवींच्या धावांना लगाम लावून बसले होते. त्यामुळे रन रेट वाढताना दिसला अन् तो कमी करण्याच्या प्रयत्नात डॅरील मिचेल ( १०) हुडाला विकेट देऊन माघारी परतला.
न्यूझीलंडचा निम्मा संघ ८९ धावांवर माघारी परतला होता आणि त्यांना अखेरच्या ६ षटकांत विजयासाठी १०१ धावा करायच्या होत्या. केन हा एकमेव आशेचा किरण त्यांच्यासाठी मैदानावर होता. पण, भारतीय गोलंदाजा चांगली कामगिरी करत होते. युजवेंद्रने २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने १६व्या षटकात चार निर्धाव चेंडू टाकताना मिचेल सँटरनची विकेट घेऊन किवींच्या अडचणी वाढवल्या. केनने अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी केली, परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. केन ५२ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. हुडाने १९व्या षटकात ३ विकेट्स घेत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १२६ धावांत तंबूत पाठवला. हुडाने १० धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि भारताने ६५ धावांनी सामना जिंकला.