दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- माधव गोटमवाड
भारतीय क्रिकेट संघ आगामी बांगलादेश दौऱ्यावर यजमान संघासोबत 3 वनडे आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 4 डिसेंबरला रविवारी ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर एकदिवसीय सामन्याने दौऱ्याची सुरुवात करणार
एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी भारतीय संघाची तयारी, या दौऱ्यापासूनच सुरुवात करायची आहे. अशा परिस्थितीत प्रशिक्षक राहुल द्रविड या दौऱ्यातून कर्णधार रोहित शर्मासाठी निश्चित सलामीचा जोडीदार शोधू इच्छितो. रोहित शर्मासोबत सलामीसाठी शिखर धवन आणि केएल राहुल टीम इंडियामध्ये उपस्थित आहेत. या दोन्ही फलंदाजांनी रोहितसोबत ओपनिंगची जबाबदारी आधीच सांभाळली आहे
टी-20 विश्वचषकात विराटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 2022च्या हंगामातही सर्वाधिक 296 धावा केल्या आहेत. तसेच अन्य फलंदाजांच्या आकडेवारीबाबत सांगायचे झाल्यास शिखर धवनने 4 सामन्यात 186 धावा केल्या आहेत. तर कर्णधार रोहित शर्माने 6 सामन्यात 143 धावा फटकाविल्या आहेत. या दौऱ्यात राहुलकडे उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गोलंदाजीबाबत सांगायचे झाल्यास जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यासुद्धा संघात नाही. या दिग्गज गोलंदाजच्या अनुपस्थित भारतीय गोलंदाजीची बाजू कमकुवत दिसत आहे. त्यातच महंमद शमीही दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्याने डोकेदुखी वाढली आहे. या स्थितीत वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे.
वेगवान गोलंदाज महंमद शमीला खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीयआयने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर सराव सत्रादरम्यान महंमद शमीच्या खांद्याला दुखापत झाली. सध्या एनसीए, बेंगळुरू येथे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहे. तो तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भाग घेऊ शकणार नाही.
संभाव्य संघ
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, महंमद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
बांगलादेश – लिटन दास (कर्णधार, यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन, शकीब अल हसन, अनामुल हक, मुशफिकुर रहीम, नुरुल हसन, इबादत हुसेन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसम अहमद, तस्किन अहमद.