दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
पालघर/जव्हार:– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५७ व्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच अहमदनगर जिल्ह्यातील कोकमठाण येथे पार पडल्या.या स्पर्धेत मूळचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील आणि एस.टी महामंडळाच्या जव्हार आगारात चालक तथा वाहक या पदावर कार्यरत असलेले पैलवान अंकुश कड यांनी कुस्ती या खेळ प्रकारात ६५ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई करत जव्हार आगाराचे नाव उज्वल केले.
महामंडळामार्फत दरवर्षी कर्मचाऱ्यांसाठी धावणे,उंचउडी,गोळाफेक,भालाफेक,थाळीफेक,शरीरसौष्ठव,कबड्डी आणि कुस्ती अश्या खेळांचा समावेश केला जात असून पुरुष व महिला कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट करून या स्पर्धा घेतल्या जातात.या अगोदरही झालेल्या वार्षिक स्पर्धेत जव्हार आगारातीलच वाहक पैलवान हरिश्चंद्र चौधरी यांनी सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले होते.हीच परंपरा कायम ठेवत या वर्षीच्या स्पर्धेत पैलवान कड यांनी आपल्या आगाराला पदक मिळवून दिले.त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल आगारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.