दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार?
कोण हरणार? याचीच सर्वांची चर्चा सुरू आहे. खास करून कसब्यात काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच एक मोठी बातमी हाती आली आहे. कसब्यात भाजपचा पराभव होणार असल्याचं एक्झिटपोलच्या निष्कर्षात म्हटलं आहे. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असल्याचंही एक्झिटपोलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. शिंदे गट आणि मनसेची साथ असतानाही आणि राज्यात सत्ता असतानाही कसब्याचा कौल भाजपच्या विरोधात जात असल्याने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्राब, सायन्स फॉर लाईफ, स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्च या चार संस्थांचा एक्झिट पोल आला आहे. त्यानुसार कसब्याची जागा भाजपच्या हातून जाणार आहे. कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी होणार असल्याचं एक्झिटपोलच्या निष्कर्षात म्हटलं आहे. कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे उभे आहेत. या तिरंगी लढतीत रासने यांना पराभव पत्कारावा लागणार असल्याचं एक्झिटपोलचं म्हणणं आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयी होणार असल्याचं एक्झिटपोलने म्हटलंय. चिंचवडमध्ये जगताप यांना मतदारांची सहानुभूती मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना पराभव पत्करावा लागणार असल्याचं एक्झिटपोलने म्हटलं आहे.