दैनिक चालु वार्ता सांगोला प्रतिनिधी-
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील हे शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध धंद्याचा सुळसुळाट रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. लोकांना विश्वासात घेवून गावागावांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करीत आहेत, पण महुद बीट मधील पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचनेला हरताळ फासला आहे. महुद बीट मध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक गावामध्ये अवैध दारू विक्री,जुगार, वाळू वाहतूक , मुलींची छेडछाड, युवकांची अवैध धंद्यातून एकमेकांना दमदाटी असे प्रकार वाढले असून, संबधित बीटचा कारभार पाहणारे अधिकारी आणि कर्मचारी मात्र याच धंदे वाल्यांच्या वसुलीत दंग असल्याची चर्चा नागरिकांतून चर्चिली जात आहे. संबधित बीट मधील पोलिसांचा वचक आणि धाकच न राहिल्याने गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची प्रतिक्रिया राजकिय आणि सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
महुद बु हे तालुक्यांतील लोकसंख्येने मोठे असणारे शहर असून कटफळ औट पोस्ट अंतर्गत महुद गाव येत असून या बीट अंतर्गत वाकी, महिम,लक्ष्मीनगर, नरलेवाडी, खवासपूर, चिकमहुद, अचकदाणी, लोटेवाडी,कटफल ही गावे येत असून या गावात अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरु आहे. ग्रामीण भागात अवैध दारू विक्री, पानटपऱ्यावर गुटखा,मावा, चोरटी वाळू वाहतूक असे धंदे वाढल्याने कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत असल्याची भावना नागरिकांतून बोलली जात आहे.
सद्या बारावीची आणि दहावीची परीक्षा सुरु असून मुलींची छेडछाड करणाऱ्या मोकाट तरुणांच बंदोबस्त करण्यासाठी संबधित पोलीस अधिकारी अपयशी ठरले आहेत, त्यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे. मागील काही दिवसांपूर्वी शेळ्या आणि मेंढ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी या कडे लक्ष द्यावे अन्यथा महुद बीट मधील पोलिसांच्या विरोधात आंदोलन उभे करू.; सतिश दीडवाघ (प्रहार तालुका अध्यक्ष)
साध्या आणि अदखलपात्र गुन्ह्यामध्ये सर्वसामान्यांना लुटणाऱ्या आणि आर्थिक “झोल”करणाऱ्या त्या वादग्रस्त पोलिसांची बदली करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. संबधित पोलिसांनी गुन्ह्यात मदत करणेकामी बीट मधील अनेक आरोपीकडून अवाच्या सव्वा रकमा घेतल्याची चर्चा नागरिकांतून कुजबुजली जात आहे. आपल्यावर राजकीय वरदहस्त असल्याने आपणाला कोणीच काही करीत नसल्याच्या आविर्भावात संबधित पोलीस कर्मचारी वावरत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी त्या वादग्रस्त पोलिसांची बदली करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बीट मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वागणे दुटप्पीपणाचे:
बीट मधील वरिष्ठ अधिकारी नागरिकांप्रती दुटप्पीपणाने वागत असल्याचे अनेकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पदाने मोठया आणि राजकीय व्यक्तींना हसतमुखाने मानसन्मान देणारे अधिकारी सर्वसामान्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांना किंमतच देत नसल्याची खंत अनेक नागरिकांनी खाजगीत बोलून दाखवित आहेत. येणाऱ्या काळात वरिष्ठ अधिकारी संबधित पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना काय समज देणार? हे पहावे लागणार आहे.