दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नवी दिल्ली : अदाणी समुहावर लावण्यात आलेल्या आरोपांची दोन महिन्यांत चौकशी करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ‘सेबी’ला दिले. या संदर्भात दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने हे आदेश दिले.
भारतीय उद्योजक गौतम अदाणी यांच्या समुहावर अमेरिकन कंपनी हिंडेनबर्गच्या अहवालात अनेक आरोप करण्यात आले. त्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीला दोन महिन्यात अदाणी समूहाची हिंडेनबर्ग अहवालाच्या पार्श्वभूमीवर चौकशी पूर्ण करण्यास सांगितले आहे. तसेच सहा सदस्यांची एक समिती स्थापन करुन ही समिती देखील सेबीसोबत चौकशीत सहभागी होणार आहे.
चौकशीसाठी सहा सदस्यांची समिती स्थापन
निवृत्त न्यायाधीश अभय सप्रे हे या समितीचे अध्यक्ष असतील. तर त्यांच्यासोबत ओपी भट्ट, न्यायमूर्ती जेपी देवधर, के. व्ही. कामत, नंदन नीलकेनी आणि सोमशेखर सुंदरेशन हे देखील या समितीत असतील. ही समिती अदाणी समूह आणि हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी करुन अहवाल तयार करेल.
अदाणी यांच्याकडून निर्णयाचे स्वागत
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गौतम अदाणी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अदाणी समूह सर्वोच्च न्यायालच्याच्या आदेशाचे स्वागत करत आहे. आता एका निश्चित वेळेत या प्रकरणातील सर्व बाबी उघड होती. सत्याचा विजय होईल.