
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
सह्याद्री फार्मसी कॉलेज उद्योजकता विकास कक्ष व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात तीन दिवसाच्या (९ -११ मार्च ) उद्योजकता जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचे उदघाटन प्रमुख प्रशिक्षक श्री.राजशेखर शिंदे,प्रकल्प आधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर,श्री.नागेश हरी कोकरे अध्यक्ष स्ट्रेटा फौंडेशन,सोलापूर,सौ.संतोषी शिंदे उद्योजिका सोलापूर,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व सर्व प्राध्यापक,विद्यार्थी,पालक यांच्या उपस्थितीत सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले. या शिबिरात प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले “आर्थिक, सामाजिक उन्नती आणि विकासामध्ये उद्योग, व्यापार, व्यवसायांचे महत्त्व, योगदान मोठे आहे. उद्योग निर्माण करणाऱ्या उद्योजकाच्या, उद्योजकतेतूनच देशाची आर्थिक प्रगती होते. उद्योजक उद्योग सुरू करतो, अनेकांना रोजगार देतो. आर्थिक व्यवहारातून, समाज, सरकार यांना कररूपाने एकंदर सामाजिक व्यवस्था चालवण्याकरिता आर्थिक मदत करतोच; पण समाजातील अनेकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरिता मदत करतो. उद्योजक संपत्ती निर्माण करतो व हीच संपत्ती देशाला समृद्ध, सुरक्षित व सक्षम बनवते.शासनाने नव्याने सुरु केलेल्या स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया या योजनांचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्याने उद्योजक बनण्याचे स्वप्न बघावे.फार्मसी क्षेत्र हे भारतातील एक उत्तम विकासाचे क्षेत्र असून फार्मासिस्टना उद्योजक बनवण्याचे भरपूर सामर्थ्य या क्षेत्रात आहे.देशात फार्मसी च्या लहान मोठया लाखो कंपन्या औषधनिर्मितीचे काम अहोरात्र करत आहेत.आज भारत देश औषध निर्मितीत जगात दुसरा क्रमांकावर आहे. औषधांची असणारी चांगली प्रत,विश्वासहर्ता,मानक,सामर्थ्य यामुळे देशातच नाही तर संपूर्ण जगात आज भारत देश औषधांची निर्यात करत आहे.त्यामुळे फार्मसी विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याची नामी संधी आहे त्याचा सर्वानी लाभ घ्यावा असे विचार मांडले. या शिबिराचे सुत्रसंचलन डॉ.एम.जी.शिंदे यांनी केले.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील,महाविद्यालय उद्योजकता विकास कक्ष प्रमुख प्रा.एस.एस.काळे, प्रा.ए.बी.मोहिते व सर्व प्राध्यापक,विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.