
मुंबई : सोनाक्षीलाही लग्नाचे वेध लागले आहेत असे म्हणणं चुकीचं ठरणार नाही.बॉलीवुडची रज्जो अर्थात सोनाक्षी सिन्हा. रुपेरी पडद्यावर तिच्या मस्त मस्त नैनांची अशी काही जादू झाली की दबंग खानसह रसिकही फिदा झाले.नेहमीच साऱ्यांशी भरभरुन बोलणारी बॉलीवुडची रज्जो आणि दबंग गर्ल आता मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.बॉलिवूडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बँड बाजा बारातचे सूर ऐकायला मिळत आहे. त्याचपाठोपाठा आता सोनाक्षी सिन्हाही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.
सोनाक्षी सिन्हा लवकरच खान कुटुंबाची सून बनणार असल्याच्या चर्चा आहेत. सलमान खानचा भाऊ सोहेल खानचा मेहुणा बंटी सचदेवासोबत सोनाक्षी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. काही वर्षापूर्वी दोघांच्या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी साखरपुडा होणार असल्याची बातमी होती. मात्र लग्नाच्या बातम्या त्यावेळी केवळ अफवाच ठरल्या होत्या.
आता पुन्हा एकदा दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि बंटी सचदेवा लवकरच एंगेजमेंट करणार आहेत, मात्र अजूनपर्यंत दोघांनीही त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाहीय.अनेकदा दोघांना बॉलिवूड पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. इतकंच काय तर एका मुलाखतीत सोनाक्षीने त्याचे कौतुक करताना म्हटले होते की, बंटी एक सेल्फ मेड मॅन आहे असे म्हणत अप्रत्यक्ष प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हा पासूनच दोघांच्या अफेअरच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअपच्याही चर्चा होत्या.
आता दोघांमध्ये सगळं काही सुरळीत झाले असून आता थेट लग्न करण्याचा दोघांनी निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते. बॉलिवूडमध्ये कधी कोणाचे नाव कोणासोबत जोडले जाईल हे सांगता येणंच कठीण. अगदी सोनाक्षीबरोबरही असेच काहीसे घडले होते.सोनाक्षीचं नाव यापूर्वी अर्जुन कपूर, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांच्याशीही जोडलं गेलं होतं. आता सोनाक्षीच्या लग्नाच्या रंगणाऱ्या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे तर वेळ आल्यावरच स्पष्ट होईल.