
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : मानवत पंचायत समिती मध्ये कार्यरत प्रभारी गट विकास अधिकारी स्वप्नील शिवाजीराव पवार व विस्तार अधिकारी संदीप बाळासाहेब पवार या दोघा अधिकार्यांविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. रुपये चार हजारांची लाच स्वीकारल्याबद्दल हे दोन्ही मासे गळाला लागले.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार जे समजले ते असे
की, यातील तक्रारदार यांनी मानवत पंचायत समिती येथे दि.१७/१०/२०२२ ते दि. २१/१०/२०२२ या कालावधी दरम्यान राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ‘आमचा गाव- आमचा विकास’ उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले होते. तक्रारदार यांच्या कामाचे मानधन १४ हजार रुपये श्री.पवार यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा झाले होते. हे मानधन घेण्यासाठी तक्रारदार यांनी सदर दोन्ही आधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटून घेऊन वारंवार मागणी केली. तरीही हे दोघे दाद देत नव्हते. शेवटी तक्रारदार यांनी वरिष्ठांना लेखी तक्रार केली. तरी सुद्धा त्यांना मानधनाची रक्कम देण्यात आलेली नव्हती.
दरम्यान, यातील श्री.पवार यांनी १४ हजार एवढ्या रक्कमेचा धनादेश न देता १० हजार एवढ्याच रक्कमेचा धनादेश आणि तोही (स्वतःच्या) वैयक्तिक बँक खात्याचा देऊन त्यातून ४ हजार रुपये एवढ्या कमिशन रुपी लाच स्वीकारली .
यातील विस्तार अधिकारी पवार यांनी मागणी केलेल्या व स्वीकारलेल्या लाचरुपी रक्कमेस प्रभारी गटविकास आधिकारी पवार यांनी पंचासमक्ष प्रोत्साहन देऊन संमती दिली.
दरम्यान स्वप्नील पवार गटविकास अधिकारी (अतिरिक्त कार्यभार), पंचायत समिती मानवत व संदीप पवार विस्तार अधिकारी ,पंचायत समिती मानवत, जि. परभणी यांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन मानवत येथे चालू असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले.
या कार्यवाही साठी
डॉ.राजकुमार शिंदे , पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, पोनि. सदानंद वाघमारे, पोनि. बसवेश्वर जकीकोरे, पोह. चंद्रशेखर निलपत्रेवार, पोह. मिलिंद हनुमंते, पोशि. अतुल कदम, पोशि. शेख मुख्तार, पोशि. शेख झिब्राईल, चालक पोह. जनार्धन कदम, अँटी करप्शन ब्यूरो टीम परभणी यानी. रचलेला सापळा अखेर यशस्वी ठरला गेला.
परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की, कर्तव्यावरील शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यापैकी कोणीही, कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केली असल्यास किंवा करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा असे आवाहन
डॉ. राजकुमार शिंदे ,
पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो,
नांदेड परिक्षेत्र, नांदेड
मोबाईल नंबर – ०९६२३९९९९४४
किरण बिडवे,
पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, परभणी
मोबाईल नंबर – ०७०२०२२४६३१
अँटी करप्शन ब्यूरो, परभणी कार्यालय दुरध्वनी – ०२४५२-२२०५९७
@ टोल फ्रि क्रं. १०६४
यांनी केले आहे.
दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईने जिल्हा परिषद वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. या दोन्ही अधिकार्यांविरोधात गेल्या कित्येक महिन्यांपासून सर्वसामान्य नागरीकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या, हे सर्वश्रुत आहे.