दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : आम्हाला धमक्या येतात तेव्हा हा स्टंट असल्याचं गृहमंत्री म्हणतात. गृहमंत्री आमची चेष्टा करतात. तुमच्या घरात जे होतं ते स्टंट नाही का?
तुमच्या घरातील प्रकरणावर तुम्ही एसआयटी स्थापन करता. लोकांना अटक करता. पण सत्य काय हे मला माहीत आहे. पण आम्हाला मर्यादा ठेवायची आहे. मी खरं बोललो तर भूकंप होईल, असा इशाराच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. काल मला धमकी आली. त्यामुळे मी तात्काळ पोलिसांना कळवलं. लोकप्रतिनिधी म्हणून पोलिसांना कळवणं माझं कर्तव्य होतं. उद्या मी सांगितलंच नव्हतं असं म्हणायला नको, म्हणून पोलिसांना कळवलं, असं संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. मी गांभीर्याने आणि काळजीपूर्वक विधान केलं आहे. राज्यात गव्हर्नमेंट स्पॉन्सर गुंडगिरी, दहशतवाद आणि दंगली सुरू आहेत, हे मी स्पष्ट सांगतो. मी घाबरणारा नाही. मी ठाण्याच्या प्रकाराबाबत गृहमंत्र्यांना सांगितलं. मर्डर केसमधून आलेल्या गुंडाकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी काय केलं? गृहमंत्र्यांनी काय केलं? तुम्ही राज्याचं गृहमंत्री आहात ना? तुम्ही काय केलं ते सांगा. मला सांगा. जनतेला सांगा, असं संजय राऊत म्हणाले.