
दैनिक चालु वार्ता जळकोट प्रतिनिधी-
ग्राहकाने वस्तूच्या दर्जाशी केंव्हाही तडजोड करू नये. तसेच ग्राहकाने कमी किंमतीच्या लोभासाठी निकृष्ट दर्जाचा माल खरेदी करू नये. जर ग्राहकाने निकृष्ट दर्जाच्या मालावर विश्वास ठेवला तर कोणत्याही क्षेत्राकडून ग्राहकांचे संरक्षण करणे शक्य नसते. म्हणून दर्जेदार वस्तूची खरेदी करणे ही ग्राहकाची जबाबदारी आहे. असे मत जळकोटच्या तहसीलदार सौ.सुरेखा स्वामी यांनी व्यक्त केले.
जागतिक ग्राहक हक्क दिन पंधरवडा दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दि.३१ मार्च रोजी जळकोट तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्दघाटन मुख्यअतिथी तथा मुख्यमार्गदर्शक ग्राहक संरक्षण परिषेदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुखअतिथी म्हणून जळकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, हावगीस्वामी महाविद्यालयाचे प्रा.अमित कवठाळे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक बी.जी.शिंदे, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रामकृष्ण मोटे, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जळकोट तालुकासंघटक संगम डोंगरे, नायबतहसीलदार राजा ऊर्फ गोविंद खरात, पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन वैजनाथ पवार, रास्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष पी.बी.गुट्टे उपस्थित होते.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक तथा ग्राहक चळवळीचे कार्यकर्ता बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, दैनंदिन व्यवहार करताना ग्राहकांची फसवणूक होता कामा नये, डोळसपणे ग्राहकांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार केले पाहिजेत, जगातील सर्व वस्तू, सेवा, व्यवसाय, उद्योग, व्यापार, सहकारी बँका, इत्यादी शासकीय यंत्रणा ग्राहकाला केंद्रबिंदू मानून निर्माण झाल्या आहेत, म्हणजे वीज वापरणारे ग्राहक आहेत म्हणून महावितरण कंपनी, मोबाईल वापरणारे ग्राहक म्हणून मोबाईल कंपनी ग्राहकांना केंद्रबिंदू मानून उभ्या राहिल्या आहेत. ग्राहक समस्यांच्या अनेक कारणांपैकी अज्ञान हे एक कारण असून त्यास आपल्या हक्काबाबत जागे केल्यास फसवणूक थांबवता येईल. आपल्या रोजच्या जीवनात वस्तू व सेवांची देवाण-घेवाण करत असतो. बहुतेक वेळा आपली फसवणूक अडवणूक होते, या अन्यायाचे निराकरण करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य उभी आहे.आपली झालेली फसवणूक घेऊन गप्प बसू नका आवाज उठवा, न्याय आपल्याला मिळणारच आहे. ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांच्या हिताला कायदेशीरपणा प्राप्त झाला आहे.आय.एस.आय., अॅमार्क, हॉलमार्क, ई.पी.ओ., एफ.ए.एस.एस.आय.इ. मालाचा उत्तम दर्जा दर्शवितात. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायबतहसीलदार राजा खरात यांनी केले. आभार पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन वैजनाथ पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अव्वल कारकुन व्ही.के.पवार, शिवराज एम्प्ले, अरविंद घाटे, लिपीक प्रितम पाटील, सौ.वैशाली मद्देवाड, राजकुमार स्वामी, नारायण रेणकुंठवार, कोंडिबा गवळी, माधव सातापुरे, उत्तम कोतवाल, सोनटक्के कोतवाल यांनी विशेष परिक्षेम घेतले.