
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी -शितल रमेश पंडोरे
——————————————————
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली असून, विहिरीचे काम सुरु असताना विहिरीलगत असलेला मलब्याचा ढिगारा ढासळल्याने त्याखाली दबून तीन परप्रांतीय मजुरांचा जीव गेला आहे. तर अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (3 एप्रिल) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झोलेगाव शिवारात घडली आहे. तर मृत आणि जखमी मजूर हे राजस्थान येथील रहिवासी आहेत. सीताराम रावत (वय 35 वर्षे), महावीर रावत (वय 38 वर्षे), बनाजी गुज्जर (वय 35 वर्षे) यांचा मृत्यू झाला असून, छोटू भिल्ल (वय 25 वर्षे) आणि रतनसिंग रावत (सर्व, भिलवाडा, राजस्थान) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील झोलेगाव शिवारातील येथील साहेबराव करंडे यांच्या याच शेतामध्ये विहिरीचे काम सुरु होते. विहिरीचे काम जवळपास 25 फूट म्हणजेच चार परसापर्यंत झाले होते. काम सुरु असताना विहिरीचा मलबा लगतच टाकण्यात आला होता. या ठिकाणी राजस्थान येथील मजूर काम करत होते. दरम्यान सोमवारी नेहमीप्रमाणे विहिरीत मजूर काम करत असताना, विहिरीलगत असलेली मलब्याचा ढिगारा अचानक ढासळून तो विहिरीत पडला.
त्याचवेळी विहिरीत काम करत असलेले पाचही मजूर मलब्याखाली दबले गेले. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. ही घटना आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिऊर नागरिकांना माहिती कळवली. त्यामुळे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तर याची माहिती शिऊर पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मजुरांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरु करण्यात झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले. साधारणतः दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर छोटू भिल्ल आणि रतनसिंग रावत या दबलेल्या दोन मजुरांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारार्थ शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर जेसीबी यंत्राच्या सहाय्याने अन्य तीन मजुरांचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात आले. विहिरीत अख्खी मलब्याची थप्पी ढासळल्याने शोधकार्यात अनेक अडथळे निर्माण होत होते. दरम्यान रात्री 8 वाजता सीताराम रावत, महावीर रावत आणि बनाजी गुज्जर या तीन मजुरांचा शोध लागला, परंतु ते तिघेही मृतावस्थेत आढळून आले. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.