दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
शहरातील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि श्री गुरुगोविंदसिंघजी सेवा प्रतिष्ठान संचलित गोळवलकर गुरुजी रक्त केंद्र ,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष , क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर दि.11एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले होते . याप्रसंगी 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद अडकिणे , उद्घाटक मातोश्री हाँस्पीटलचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. अशोक कौरवार , प्रमुख पाहुणे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल शेटवाड , वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर तहाडे , मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , गोळवलकर गुरुजी ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती . मान्यवरांच्या हस्ते वीरभद्र स्वामी , महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पुजनानंतर कार्यक्रम सुरू झाला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी तथा क्षेत्रिय समन्वयक प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे तर आभार प्रदर्शन सहकार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. भारत केंद्रे यांनी केले .
रक्तदान करणाऱ्यांना स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र ,पुष्पहार देऊन गौरविण्यात आले . गोळवलकर गुरुजी ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी बालाजी शिंदे , राम महाजन , विठ्ठल हेडे , तांत्रिक सहाय्यिक दमयंती बाच्छे , आरती जाधव , इंदुमती मावशी यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला . मान्यवरांच्या भाषणात डॉ. अशोक कौरवार यांनी आरोग्य सेवा देत असताना कठीण प्रसंगात रूग्णाला आधार देण्याचे कार्य रक्तदाता करत असतो . संकट समयी मिळालेली साथ रुग्ण व नातेवाईकांच्या चिरस्मरणात राहत असते . समाजामध्ये रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे . महाविद्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या अभिनव उपक्रमाला आणि सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिले . भविष्यात या महाविद्यालयाचा आदर्श इतरांनी घ्यावा असे विचार व्यक्त केले . डॉ.शेटवाड , डॉ. तहाडे , प्रा. साखरे आणि बालाजी शिंदे यांनी आपल्या विचारातून रक्तदानाच्या पवित्र कार्याचे कौतुक केले . समाजाला उभारी घेण्यासाठी असेच शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक जबाबदारी ओळखून आपले योगदान दिले पाहिजे . रक्तदानाचे फायदे , समज – गैरसमज या विषयावर सखोल मार्गदर्शन केले .
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून आयोजित केलेल्या यशस्वी रक्तदान शिबीरामुळे अभिनंदन केले . तसेच महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांत निरंतर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सर्वजण सहभागी व्हावे असे आव्हान केले . रक्तदानामुळे जिवनदान देण्याचा मूलमंत्र म्हणजेच आजचा रक्तदान शिबीर होय . भविष्यात अधिक जोमाने या शिबीरातून प्रेरणा घेऊन नवनवीन कल्पकतेचा अंगीकार करावा . आतापासून दरवर्षी रक्तदान शिबीर महाविद्यालयात घेण्यात येणार आहे . संस्थेची व महाविद्यालयाची निर्मिती ज्या ध्येय – धोरणांना डोळ्यासमोर ठेवून स्थापना झाली आहे . तो उद्देश साध्य करण्यासाठी प्रत्येक जण कार्य करावे . सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी जात , धर्म , पंथ साथ न देता रक्ताने तयार झालेली नाती ही दीर्घकाळासाठी टिकणारे असतात असे विचार मांडले . ब्लड बँकेच्या वतीने प्राचार्यांचे व कार्यक्रमाधिकारी यांचे प्रशस्ती पत्र , स्मृतिचिन्ह , पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .याप्रसंगी बहुसंख्येने विद्यार्थी , विद्यार्थिनी , प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , नागरिक , पत्रकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले .