दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड – अंगद कांबळे
तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील गाववाडी वस्तीवर खासदार सुनिल तटकरे,आमदार आदिती तटकरे यांचे प्रयत्नाने करोडो रुपयांची छोटी मोठी विकास कामे झाली आहेत तर काही ठिकाणी कामे प्रगती पथावर आहेत.विकास कामांची मालिका सुरु असली तरी कामाचा दर्जा मात्र सुमार असल्याचे निदर्शनास येत आहे.तीनच महिण्यापुर्वी ग्रामपंचायत कणघर येथे डोंगरी विकास कार्यक्रम योजनेमधून ८.५ लक्ष रुपये खर्च करून अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते परंतु काही दिवसातच या इमारतीचा स्लॅब ढाचा निखळला असल्याने तक्रारीचा सूर पुढे येत आहे.ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे इमारतीचा बांधकाम कमकुवत असल्याचे निदर्शनास आले आहे.लाखो रूपये खर्च करून शासन निधी पाण्यात गेल्याने मागील तीन महिन्यांपासून कणघर येथील चिमुकळ्यांची अंगणवाडी ग्रामस्थांच्या घरात भरण्याची वेळ आली आहे.
दिनांक 30/07/2022 रोजी या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांचा हस्ते करण्यात आले होते. उदघाटनानंतर तीन महिन्यातच अंगणवाडी इमारतीचा स्लॅब कोसळला या घटनेची तात्काळ दखल घेऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी इमारतीचे निकृष्ठ बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर आणि संबंधित बांधकाम अभियंतावर कारवाई करावी अशी लेखी मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे कणघर सरपंचानी केली आहे.खासदार, आमदार प्रयत्न करून म्हसळा तालुक्यात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देत असले तरी ठेकेदार आणि अधिकारी दर्जेदार कामे करीत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू पहायला मिळत आहे.
-कणघर येथील अंगणवाडी इमारतीचा काम नित्कृष्ट झाला आहे.याबाबत लेखी तक्रार गटविकास अधिकारी यांना दिलेली आहे.अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.बांधकाम ठेकेदाराला गटविकास अधिकारी यांनी काळ्या यादीत टाकावे अशी आमची मागणी आहे.”
श्री.धनंजय सावंत
उपसरपंच -ग्रामपंचायत कणघर
-कणघर अंगणवाडी इमारत बांधकाम बाबतीत ग्रामपंचायत कणघर सरपंच यांचा तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे.संबंधित ठेकेदाराला काम करून घेण्यास सांगितले आहे.ठेकेदाराने काम केले नाही तर काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात येईल.”
बी.एस.पोळ
गटविकास अधिकारी – पंचायत समिती म्हसळा