दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर येथील महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या नऊ ट्रक व हायवा वाहनावर कारवाई करीत ही वाहने तहसीलच्या कार्यालयाच्या प्रांगणात लावली.
वाळू वाहतूक करणाऱ्या या हायवा गाड्या व ट्रक कर्नाटक राज्यातील ठेकेदाराच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाते. या वाळूला कर्नाटक राज्यात मोठी मागणी असल्याने वाळू देगलूर मार्गे कर्नाटक राज्यात जात होती. काही जागरूक नागरिकांनी रविवारी सकाळी१० वाजता नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड यांना ही माहिती कळविली असता त्यांनी पथकाला सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचत अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली.
वाळूचे सुधारित धोरण येणार असल्यामुळे यंदाची लिलाव प्रक्रिया शासनाने थांबवली आहे. मात्र, हा निर्णय वाळू तस्करांच्या पथ्यावर पडला असून, त्यांना अवैध वाळूचा उपसा करण्यासाठी रान मोकळे झाले आहे.
देगलूर तालुक्यासह बिलोली तालुक्यातील अनेक वाळू घाटांवरून शासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून अवैध वाळू वाहतूक बिनदिक्कतपणे रात्री-बेरात्री केली जात होती. या कारवाईमुळे देगलूर येथील वाळू माफियांचे धाबे दणाणले हे मात्र नक्कीच.