दैनिक चालु वार्ता छत्रपती संभजीनगर प्रतिनिधी : अन्वर कादरी
छत्रपती संभाजीनगर येथुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मार्ट सिटीमधून प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीसोबत कंडक्टरने अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंडक्टरने पीडितेचा हात धरून तिच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केली. तसेच सोबत आईस्क्रीम खाण्यासाठी येण्याचा आग्रह धरला. तरुणीने आरडाओरडा केला. बस थांबवत आपली सुटका करून घेतली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमके काय घडले?
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय पीडित मुलगी कॉमर्स शाखेच्या पहिल्या वर्षात शिकते. आपल्या मैत्रिणींसोबत बसमधून प्रवास करते. मात्र 13 एप्रिलला मैत्रिणी नसल्याने ती एकटी बसमधून प्रवास करत होती. यावेळी बसमध्ये कंडक्टर वगळता तीन प्रवासी होते. तिच्यासोबत मैत्रिणी नसल्याची बाब कंडक्टरने हेरली. त्याने तिच्याकडून तिकिटाचे 25 रुपये घेतले, परंतु त्या बदल्यात तिकीट न देता रोज सोबत असणाऱ्या मैत्रिणींविषयी त्याने विचारपूस सुरू केली.
तरुणीने शेजारच्या सीटवर तिची बॅग ठेवली होती. इतर प्रवाशांचे तिकीट काढल्यानंतर कंडक्टर तिच्याजवळ गेला व बॅग उचलून तिच्या शेजारी जाऊन बसला. त्याने तिच्याविषयी माहिती विचारण्यास सुरुवात केली.
प्रवाशाला म्हणाला, ‘आम्हाला आइस्क्रीम द्या’
आइस्क्रीमच्या दुकानासमोरील एका थांब्यावर बस थांबली. त्या वेळी बसमधून उतरलेल्या प्रवाशाला कंडक्टरने पैसे दिले व ‘आमच्यासाठी त्या दुकानातून आइस्क्रीम द्या हो,’ असे सांगितले. रंजना त्याचे विक्षिप्त वागणे पाहून घाबरली. तिने घाबरतच त्याला नकार दिला. त्यानंतर त्याने पुन्हा मोबाइल क्रमांक मागितला. ती प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्याने तिच्या हातातून मोबाइल ओढून घेत स्वत:चा नंबर डायल केला.
‘मी नंबर यासाठी दिला, जेणेकरून तू उतरल्यानंतर थोडा वेळ उभी राहा. मी लगेच परत येतो. आपण काहीतरी खायला जाऊ,’ अशी बडबड तो करू लागला. तरुणीला त्याचे वागणे मात्र असह्य झाले. तिने तेथून निघण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तिचा हात पकडण्यापर्यंत मजल गेली. तिने आरडाओरड
सुरू केली. ‘बस थांबवा,’ असे जोरात ओरडताच चालकाने बस थांबवली. त्यानंतर ती तत्काळ बसमधून खाली उतरली.
एवढे घडूनही ‘बाय’ करत होता
रंजनाने आरडाओरड करून बस थांबवायला लावली. बसमधून उतरल्यानंतर कंडक्टर दरवाजात आला. त्याने हसत हात हलवून तिला ‘बाय’ करत अश्लील इशारे केले.
आरोपीला लवकरच अटक करू
घाबरलेल्या अवस्थेतच तिने घर गाठत हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर तिने सिडको पोलिस ठाण्यात जाऊन याविषयी तक्रार दिली. निरीक्षक संभाजी पवार यांनी तत्काळ भादंवि 354 (ड) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाशी संपर्क साधण्यात येत असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे पवार यांनी सांगितले.