दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.27 वाघोलीतील पोस्टमन नामदेव गवळी यांनी वाघोली जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या तब्बल सातशे बत्तीस मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते काढून शंभर टक्के शाळा सुकन्यामय करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेत खाण कामगार तसेच हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब घरातील मुली आहेत. त्यांच्या शिक्षणाचा तसेच लग्नाचा खर्च पालकांना पेलता यावा यासाठी पोस्टमन नामदेव गवळी यांनी जिल्हा परिषद शाळेत जाऊन सलग दोन वर्षे पाठपुरावा केला. वेळोवेळी शाळेत सुकन्या समृद्धी योजनेचे माहिती सत्र घेऊन पालकांमध्ये जागरूकता निर्माण केली. मुलींच्या सक्षमीकरणासाठी भारतीय डाक विभागाचे सुकन्या खाते अत्यंत लाभदायक आहे. या खात्याचे महत्व ओळखून गरजूंना त्याचा लाभ व्हावा यासाठी पोस्टमन गवळींनी सातत्याने प्रयत्न करून तब्बल ७३२ मुलींची शाळा शंभर टक्के सुकन्यामय केली. सुकन्या समृद्धी योजनेचे बहुतांश खाते उघडण्यासाठी गवळी व वाघोली ग्रामस्थांनी आर्थिक मदत केली आहे. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी देखील यासाठी यांचे याकामी सहकार्य लाभले.