दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील निकालाने जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाल्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार जिल्हा स्तरावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवार या दोन दिग्गज नेत्यांनी राजकीय खेळी खेळत आपल्या समर्थकांना बाजार समितीच्या निवडणुकीत विजय मिळवून देत आपले सहकार क्षेत्रातील वर्चस्व कायम ठेवत
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, राजुरा, कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीवर निर्विवाद सत्ता मिळवली आहे. राजकीयदृष्ट्या विचार करण्यास लावणारा निवडणूक निकाल म्हणजे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे पाटील यांचा झालेला पराभव राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. ते खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचे कट्टर समर्थक म्हणून चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात ओळखल्या जातात.
चंद्रपुरात मुनगंटीवार, वडेट्टीवार संयुक्त पॅनल तर ब्रम्हपुरी,सिंदेवाही,मुल बाजार समितीवर वडेट्टीवार यांचे तर राजुरा कोरपना येथील बाजार समितीवर आजी,माजी आमदार सर्वश्री सुभाष धोटे, सुदर्शन निमकर संजय धोटे यांच्या संयुक्त पॅनल ने आपली विजयी पताका फडकावत आपल्या राजकीय अस्तित्वाची चुनूक दाखविली आहे. या व्युहरचेत जिल्हा ग्रामीण भाजपाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा ग्रामीण काॅंग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष संतोष रावत आदींनी महत्वपूर्ण भुमिका पार पाडल्याचे कळते.