दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – आत्माराम जाधव
रिसोड : तालुक्यातील गणेशपुर ( केनवड ) येथे संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त दोन दिवसीय हरिनाम सप्ताहाचे आयोजन गजानन भक्त, विश्वनाथ तुकाराम शेवाळे यांनी केले होते. त्यानिमित्त काल्याचे किर्तन व दुपारी महाप्रसादाचे वितरण करून सप्ताहाची सांगता झाली.
सदर सप्ताहात विनोदाचार्य, वाणीभूषण, ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज तांबे अहमदनगर यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यांना मृदंगाचार्य नागेश महाराज व कृष्णा महाराज यांनी साथ दिली, तर तुषार महाराज, सतीश महाराज आणि विकास महाराज यांनी आपल्या सुरेल आवाजात भजन गायन केले. दरम्यान गणेशपुर, केनवड, कोयाळी येथील भजनी मंडळीने साथ संगत दिली. शेगावचे संत गजानन महाराज यांचे निस्सिम भक्त म्हणून, सुपरिचित असलेले विश्वनाथ तुकाराम शेवाळे यांनी सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने गणेशपुर नगरी गण, गण,गणात बोते होते या संत गजानन महाराज यांच्या भजनाने न्हाऊन निघाली होती. महाप्रसादाचे वितरण करून सदर सप्ताहाची सांगता झाली. या निमित्ताने पंचक्रोशीतील शेकडो भाविक भक्तांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.