दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जिल्हा क्रीडा विभागाने केली घोषणा
जव्हार: शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲड.पारस सहाणे यांना सन-२०२३ चा पालघर जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.पालघर जिल्हा क्रीडा विभागाने नुकतीच त्यांच्या नावाची घोषणा केली.आज १ मे महाराष्ट्र दिनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पालघर जिल्हा मुख्यालय येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध विषयात युवांनी पार पाडलेल्या भुमिका,दिलेले योगदान व त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर राज्याचे क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत युवा पुरस्कार देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेले,निसर्गसंपन्न जव्हार नगरीवर जशी निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे तशीच आदिवासी बांधवांची सांस्कृतिक राजधानी म्हणून जव्हारची ओळख आहे.संस्थानिक पार्श्वभूमी व वैचारिक बैठक लाभलेल्या या जव्हार नगरीत अनेक रत्ने जन्माला आली व त्यांनी नावलौकिक प्राप्त केला गांव माझा..मी गावाचा… या उक्तीप्रमाणे जव्हारीत अनेकांनी शहराच्या व आदिवासी भागाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे.तालुक्याच्या विकासासाठी व आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचाविण्यासाठी अहोरात्र झटणा-या शहरातील एका युवकाला पालघर जिल्हा युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याने युवकांसाठी एक नवा आदर्श निर्माण होणार आहे.
सहाणे यांनी उच्च शिक्षण घेऊन सुद्धा बाहेरगावी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून जव्हारचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याने जव्हार गावातच राहून जव्हार शहराचा पर्यटन विकास करण्यास वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षांपासून सुरुवात केली.जव्हार पर्यटन स्थळाला सुगीचे दिवस आलेत त्यात त्यांचे बहुमोल असे योगदान आहे.समाजसेवेच्या माध्यमातून तालुक्याची शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.ग्रामीण आदिवासी तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या सुधारणेसाठी सहाणे यांचा शासनाकडे सातत्याने आग्रह आहे.सहाणे यांना युवा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
———
सामाजिक कार्यकर्ते पारस सहाणे यांचं कार्य मी खूप वर्षापासून पाहत आहे.आपल्या देशासाठी,आपल्या भूमीसाठी कुठली अपेक्षा न करता त्यांचे कार्य सुरू असते.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो.
प्रकाश निकम अध्यक्ष-जिल्हा परिषद,पालघर