दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
पुणे : महिला कुस्तीगीरांवर झालेल्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीगीर महिलांच्या लढ्याला देशातील सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होऊन या लढ्याला पाठिंबा मिळावा यासाठी अभिव्यक्ती संघटनेकडून बुधवार ( दि.०३) रोजी पुण्यातील डी मार्ट, वारजे, महात्मा गांधी रस्ता कॅम्प आणि कलाकार कट्टा या परिसरात जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
एकीकडे महिला खेळाडूंचे गुणगान गाताना या महिला खेळाडू देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत, अशी खोटी कौतुकाची थाप द्यायची आणि बेटी बचाओ बेटी पढाओ, मातृवंदन, नारी शक्ती अशी विशेषणे वापरायची मात्र वास्तवात स्त्रियांच्या संरक्षणासाठी कोणतीही आवश्यक ठोस कृती करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नसलेल्या आणि स्त्री म्हणजे केवळ उपभोगाची वस्तू आहे अशा विचाराच्या या सरकारचा निषेध करण्यासाठी अभिव्यक्ती संघटनेच्या वतीने या जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी सर्वसामान्य पुणेकर नागरिक,विद्यार्थी,विद्यार्थिनी महिला यांच्याशी या घटनेला धरून खुली चर्चा करण्यात आली.तसेच महिला संघटनांच्या असणाऱ्या विविध मागण्यांविषयी देखील चर्चा झाली. यामध्ये एखादी महिला म्हणत असेल की, तिच्यावर अत्याचार झाला आहे, तर हो झाला आहे. तिच्यावर अत्याचार कधी झाला आणि ती आत्ता बोलतेय हे मुद्दे गौण आहेत. अशा मुद्यांना राजकीय रंग देण्याआधी ती महिला असून तिचा मानभंग झाला आहे हे महत्त्वाचे आहे. यासारख्या अनेक विषयांवर सर्वांसोबत चर्चा करण्यात आली.खेळाडू महिलांवर ही परिस्थिती ओढवत असले तर देशातल्या सामान्य महिलांची सुरक्षा आणि सुरक्षितता कशी आणि कुठे असणार असा प्रश्न यावेळी उपस्थितांना पडला होता.
याप्रसंगी संबंधित घटनेविषयी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने महिला कुस्तीगीरांवर होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या विरोधात सरकारने आजतागायत कोणतीच कायदेशीर कारवाई केलेली नाही याचा अभिव्यक्ती संघटनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.या अन्यायाविरोधात कुस्तीगीर महिलांनी वाचा फोडत उभ्या केलेल्या लढ्याला अभिव्यक्ती संघटनेचा पाठिंबा जाहीर करण्यात आला . शिवाय यामध्ये गुन्हेगार असलेल्या ब्रिजभूषण शरण सिंह आणि इतर आरोपींना त्वरित अटक करावी यासह सर्व क्रीडा महासंघ आणि क्रीडा संकुल या ठिकाणी लैंगिक छळ विरोधी कायद्यांतर्गत समित्या स्थापन कराव्यात, तक्रारदारांना संरक्षण देऊन त्यांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करावी, पॉक्सो, कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि लैंगिक अत्याचार विरोधी अन्य दखलपात्र कलमांचा वापर करून आरोपींवर त्वरित गुन्हे दाखल करावेत या मागण्या अभिव्यक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.