दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक- दीपक कटकोजवार
वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने चालू वर्षांत नवीन सामाजिक उपक्रम हाती घेतला असून, गावाकडे चला या उपक्रमाची सुरुवात देशभरात करण्यात आलेली आहे. एक शाखा एक गाव दत्तक घेऊन त्या गावात नियमित आरोग्य शिबिरासह विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरदकुमार अग्रवाल यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित मीट दी प्रेस कार्यक्रमात दि.३० में २०२३ ला दिली.
आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरदकुमार अग्रवाल, महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विविध जिल्ह्यांना ते भेटी देत आहेत. मंगळवारला ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
चंद्रपूर आयएमएने दत्तक घेतलेल्या बेलसनी येथे मंगळवारी आरोग्य शिबिराचे उद्घाटन त्यांनी केल्यानंतर चंद्रपूरात डॉ. अग्रवाल आणि डॉ. कुटे यांनी स्थानिक माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप करीत आयएमच्या कार्याची आणि राबवित असलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती देत.
इंडियन मेडिकल असोसिएशन ही जगातील सर्वात मोठी सामाजिक आणि वैद्यकीय संघटना आहे. तब्बल चार लाखांवर डॉक्टर या संघटनेशी जुळले असुन स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही संघटना वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती डॉ. अग्रवाल यांनी दिली. कोविड काळात आयएमच्या डॉक्टरांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद राहलेलेले आहे. कोरोना ला नियंत्रणात ठेवण्यात येथील डॉक्टरांनी मोठे योगदान दिले असून, जगानेही यासाठी भारताच्या डॉक्टरांचे कौतुक केल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. कोरोना रुग्णांना जीवनदान देताना दोन हजारावर डॉक्टरांचाही बळी गेला. या सर्व डॉक्टरांच्या कुटुबीयांच्या पाठीशी आयएमए खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. डॉक्टरांवर अलीकडे हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत, अशी खंत व्यक्त करीत सरकारने यासाठी कठोर कायदे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गावाकडे चला उपक्रमांतर्गत गावे दत्तक घेऊन तेथे नियमित आरोग्य शिबिरे घेण्यासह सिकलसेल रुग्णांना नियमित मार्गदर्शन व औषधोपचार करण्यात येणार आहे. डॉक्टरांना थेट ग्रामस्थांशी जोडणे हा यामागील हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला डॉ. अग्रवाल, डॉ. कुटे यांचा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. जयेश लेळे, डॉ. शिवकुमार उत्तुरे, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. संतोष कदम, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. प्रकाश देव, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. अनिल पाचणेकर, डॉ. कीर्ति साने आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.