दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
अडीज वर्षे वयाच्या मुलाला शिक्षणासाठी मामाकडे म्हणजे आजोळी दहिटणे या गावी सोडून अंधारात लिहण्या- वाचण्यासाठी समई ठेवून सासरी आलेल्या निरक्षर असणाऱ्या ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या आईच्या दुरदृष्टीचा प्रकाश असणारा नातू म्हणजेच डॉ.अशोक मोहेकर असल्याचे भावस्पर्शी उदगार छात्रभारतीचे माजी महाराष्ट्र अध्यक्ष तथा स्वराज इंडियाचे नेते प्रा. अर्जुन जाधव यांनी काढले.
कळंब येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली निराधार बालकाश्रम येथे प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमाने डॉ.अशोक मोहेकर यांचा ७० वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उद्योग समूहाचे चेअरमन हनुमंत (तात्या) मडके यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १५ जून २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता संपन्न झाला.
याप्रसंगी पुढे बोलतानी प्रा.अर्जुन जाधव म्हणाले की,मोहेकर गुरुजी १९५१ ला कृषी पदवीधारक असून सुद्धा महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,भाऊराव पाटील,स्वामी रामानंद तीर्थ,पंडित नरेंद्रजी यांच्या विचाराचा प्रभाव असल्याने पोलीस अँक्शन पूर्वी बीडचे बलभीमराव कदम,परभणीचे आप्पासाहेब गव्हाणे, उस्मानाबादचे नरसिंहराव काटीकर देशमुख, डॉ. शंकरराव जाधव, व्यंकटराव जाधव,बार्शीचे जगदाळे मामा,क्रांती सिंह नाना पाटील,कळंबचे गणपतराव कथले, औरंगाबादचे विनायक पाटील,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहवासामुळे ऐशआरामाची,प्रतिष्ठेची, अधिकाराची नोकरी न करता उस्मानाबाद जिल्ह्यातील मोहा,येरमाळा आणि परिसरामध्ये आडवळणी ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य तनमनधनाने मोहेकर गुरुजींनी केले.
गुरुजींची ज्ञानज्योत तेवत ठेवण्याचे कार्य अनेक संकटावर मात करून डॉ.अशोक मोहेकर करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ.अशोक मोहेकर यांनीही सत्काराला उत्तर देताना बऱ्या वाईट प्रसंगाचा सामना करत असतानी वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून त्रास झाल्यास प्रामाणिकपणे काम करत असल्याचा पश्चाताप होतो असे भावपूर्ण उद्गार काढले. तर अध्यक्षीय समारोपातून हनुमंत तात्या मडके यांनी डॉ.अशोक दादांच्या कुशल मार्गदर्शनामुळेच मोहेकर उद्योग समूहाने अल्पावधीतच गगणभरारी घेतली असून अण्णांची पुण्याई असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारीचा प्रश्न काही अंशी निकाली काढण्याचा यशस्वी प्रयत्न झाला असून अण्णांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पूर्ण टिम अहोरात्र परिश्रम घेत असल्याचे सांगितले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.के. कुलकर्णी,ह.भ.प. महादेव महाराज आडसूळ यांनी मनोगत पर डॉ.अशोक मोहेकरांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उत्कृष्ट डी.टी.पी ऑपरेटर सुमित जावीर, राजश्री शाहू महाराज पुरस्कार प्राप्त अच्युत माने,अनंत घोगरे आणि वाढदिवसानिमित्त सेवानिवृत्त प्रा.जालिंदर लोहकरे यांचा सत्कार करण्यात आला तर डॉ.अशोक मोहेकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर, भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावित्रीबाई फुले विद्यालय,विद्याभवन हायस्कूल व श्री संत ज्ञानेश्वर निराधार बालकाश्रम आदी शाळेतील ९० विद्यार्थी-विद्यार्थ्यांनीस शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तर जिल्हात प्रथम,द्वितीय, तृतीय आलेल्या आर्या काकडे,कल्याणकर,गौरी गुंडरे,चैतन्य कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात येऊन माता जिजाऊंची प्रतिमा भेट देण्यात आली.
सोहळ्याच्या सुरुवातीस शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शिवशाहीर बंडू खराटे यांनी डॉ.अशोक मोहेकर यांच्या कार्यावर पोवाडा सादर केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबुद्ध रंगभूमीचे अध्यक्ष सुभाष घोडके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अविनाश घोडके यांनी तर आभार स्वराज इंडियाचे शहराध्यक्ष माधवसिंग राजपूत यांनी मानले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्षा सलमा सौदागर,अँग्रोचे कार्यकारी संचालक डॉ.संतोष मडके, सौ.जाधव,ज्योती सपाटे, विद्याभवन हायस्कुलच्या उपमुख्याध्यापिक एस.डी. खोसे,संजय जगताप,सुभाष लाटे,अरविंद शिंदे, नारायण दशवंत,मधुकर शिलवंत,बंडू ताटे,संतोष मोरे,प्रा.दादाराव गुंडरे,संदिप सूर्यवंशी,पत्रकार संभाजी गिड्डे,श्रीकांत मडके, फुलचंद मडके,राहुल मडके, विकास कदम,डॉ. संजित पाखरे,अमजत खान,ग्रामसेवक दयानंद शिंदे आदींची उपस्थिती होती.