दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
समाजातील विधवा परित्यक्ता अशा परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या एकल महिलांना आधार देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असलेल्या हसेगाव (के) येथील पर्याय संस्थेच्या माध्यमातून फिनोलेक्स पाईप व मुकूल माधव फाउंडेशन यांच्या मदतीतुन चार तालुक्यातील 424 महिलांना आगामी खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पंचायतराज सशक्तीकरण, महिला सबलीकरण, बाल पंचायत,गायरान हक्क, बचतगट चळवळ, दुष्काळ निवारण, जलसंधारणातुन मनसंधारन, जमीन अधिकार आंदोलन आदी विविध विषयांवर ही मागच्या अनेक वर्षांपासून भरीव काम करणाऱ्या हसेगाव (के) ता. कळंब येथील पर्याय सामाजिक संस्थेने मागच्या दिड दशकात समाजातील एकल महिलांचे अतुलनीय असे संघटन केले. समाजातील विधवा, परित्यक्ता घटस्फोटीत, शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा अशा एकल महिलांना संस्थेचे कार्यवाहक तथा सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आणून अशा महिलांचे मनोधैर्य वृध्दींगत केले.
परिस्थितीशी दोन हात करण्याचे बळ पर्यायाने निर्माण केले. या विषयावर रचनात्मक काम करत असताना यातील बहुतांश महिला स्वतः शेती कसत आहेत हे दिसून आले आहे म्हणून पर्यायाने बेभरवशाच्या शेतीमध्ये या एकल महिलांना आधार देण्याची संकल्पना फिनोलेक्स पाईप मुकुल माधव फाउंडेशन यांच्याकडे मांडला त्यातून पुढे पेरणीसाठी बियाणे व तत्सम साहित्य मोफत वाटप करण्यात येत आहे.
आज कोटींचे बियाणे वाटप
पाच वर्षांपासून आजवर
पर्याय सामाजिक संस्थेशी जोडलेल्या एकल महिलांना मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स पाईप अंशाच्या दातृत्वातुन बियाणे देण्यात येते. या उपक्रमाचे यंदाचा सहवे वर्ष आहे. यातुन आज वर एक कोटी रुपयांच्या वर बियाणे पुरवत आधार दिलेला आहे. असे संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ तोडकर यांनी सांगितले यशस्वितेसाठी अनिता तोडकर, सुनंदा खराटे, भिकाजी जाधव, अतुल चिलवंत, विकास कुदळे, अशोक शिंदे, रामलिंग स्वामी आदींनी परिश्रम घेतले.
चार तालुक्यातील 424 महिलांना आधार
पर्याय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स पाईप यांनी कळंब, भुम, परंडा व वाशी या चार तालुक्यातील 424 महिलांना आगामी पेरणीसाठी सोयाबीन व उडीद बियाण्याचे मोफत वाटप केले आहे यावेळी पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ तोडकर, कृषी अधिकारी संतोष हउरगट, मुकुल माधव फाउंडेशन चे बबलू मोकळे, फिनोलेक्स पाईपचे अमोल ठाकरे, विठ्ठल तोडकर, अनिक फायनान्स चे मोहीम प्रमुख विलास गोडगे, तेजश्री भालेराव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले